
विराट कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाला पहिल्या दोन लढतींत सपाटून मार खावा लागला आहे. आता बुधवारी वन डे मालिकेतील तिसरा अन् अखेरचा सामना बुधवारी कॅनबेरा येथे होणार आहे. अॅरोन फिंचचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ या लढतीत विजय मिळवून 3-0 अशा निर्भेळ यशासह मालिका खिशात घालण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल. टीम इंडियाला मात्र उद्याच्या लढतीत विजय मिळवून प्रतिष्ठा राखायचीय. सलग दुसऱया वन डे मालिकेत 3-0 अशा फरकाने पराभव टाळण्यासाठी विराट कोहलीची सेना प्रयत्नांची पराकाष्ठा करील.
गोलंदाजीत बदल निश्चित
पहिल्या दोन्ही लढतींत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे हिंदुस्थानचा संघ पहिल्याच डावानंतर बॅकफूटवर फेकला गेला. हिंदुस्थानच्या गोलंदाजांना आलेले अपयश दोन्ही पराभवांचे कारण ठरले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल यांच्यापैकी एकालाही चांगली गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजीत बदल निश्चित आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन, शार्दूल ठाकूर या वेगवान गोलंदाजांसह कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आल्यास आश्चर्य वाटायला नको.
बेंच स्ट्रेंथला संधी
उद्याच्या लढतीत दोन्ही संघांमध्ये बेंचवर बसलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही. हिंदुस्थानच्या गोलंदाजी विभागात बदल अटळ आहेत. पण फलंदाजी विभागात बदल करण्यात येतील की नाही हे आताच सांगता येणार नाही. शुभमन गिल, मनीष पांडे व संजू सॅमसन हे संधी मिळण्याची वाट बघत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या चमूतही डार्सी शॉर्ट व सीन अॅबॉट यांना चान्स मिळण्याची शक्यता आहे.
या आकडेवारीवर एक नजर
- कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे आतापर्यंत फलंदाजांचेच वर्चस्व दिसून आले आहे. येथे 6.36 च्या सरासरीने धावा काढल्या जात आहेत.
- पॅनबेरा येथे झालेल्या अखेरच्या लढतीत हिंदुस्थानला अपयश आले आहे. ऑस्ट्रेलियाने या लढतीत विजय मिळवला होता.
- विराट कोहलीला 12 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी आणखी 23 धावांची गरज आहे. असे झाल्यास कमीतकमी डावांमध्ये 12 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला फलंदाज ठरणार आहे. याआधी सचिन तेंडुलकरने 300 डावांमध्ये 12 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे
- मोहम्मद शमीला 150 बळी मिळवण्यासाठी आणखी दोन फलंदाज बाद करण्याची गरज आहे.
न्यूझीलंडमध्ये 3-0 अशा फरकाने हार
हिंदुस्थानी संघाने या वर्षी फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडचा दौरा केला. या दौऱयात न्यूझीलंडने टीम इंडियाला 3-0 अशा फरकाने हरवले होते. त्यानंतर हिंदुस्थानचा संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी भिडणार होता, पण कोरोनामुळे ही मालिका स्थगित करण्यात आली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे हिंदुस्थानचा संघ थेट ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडियाचा संघ 2-0 अशा फरकाने पिछाडीवर आहे. उद्याच्या लढतीत हा संघ पराभूत झाल्यास सलग दुसऱयांदा हिंदुस्थानी संघावर 3-0 अशा फरकाने पराभूत होण्याची नामुष्की ओढवेल.
खेळपट्टी व वातावरण
मनुका ओव्हल स्टेडियमची खेळपट्टी ही नेहमीच फलंदाजांसाठी नंदनवन ठरलीय. उद्याही या लढतीत धावांचा पाऊस पडण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. येथील सीमारेषाही दूर आहेत. मागील सात लढतींमध्ये प्रथम फलंदाजी करणारा संघ येथे विजयी झाला आहे.