आजपासून आयपीएलचा धमाका; आठ संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस

यूएईमध्ये शनिवारपासून आयपीएल या हिंदुस्थानातील टी-20 लीगला सुरुवात होणार आहे. दरवर्षी एप्रिल ते मे या कालावधीत खेळवण्यात येणारी ही स्पर्धा या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत हिंदुस्थानऐवजी यूएईतील तीन ठिकाणी पार पडणार आहे. आठ संघांमध्ये खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला 10 नोव्हेंबरला होईल. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स व महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज या दोन गतविजेत्यांमध्ये अबुधाबी येथे सलामीचा सामना रंगणार आहे.

हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींसाठी लढतीचे टायमिंग बदलले

हिंदुस्थानात रात्रीच्या लढती आठ वाजता सुरू करण्यात येतात, पण यंदा ही स्पर्धा यूएईत होत आहे. याप्रसंगी रात्रीच्या लढतींची वेळ आठऐवजी 7.30 अशी करण्यात आली आहे. हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींच्या दृष्टिकोनातून वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. दुपारच्या लढतींना 3.30 वाजता सुरुवात होईल. तसेच या वर्षी दहा वेळा दिवसाला दोन लढतींचे आयोजन करण्यात येणार आहे.

फक्त 36 तासांचा क्वारंटाइन कालावधी

आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या संघांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या संघांतील तब्बल 21 खेळाडू आयपीएलमधील विविध संघांमधून खेळणार आहेत. यावेळी त्यांना आता 6 दिवसांऐवजी फक्त 36 तासांच्या क्वारंटाइन कालावधीची अट ठेवण्यात आलेली आहे.

फायनल पहिल्यांदाच रविवारी होणार नाही

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात साखळी फेरीत 56 लढतींचा थरार पाहायला मिळणार आहे. 19 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत या लढती खेळवण्यात येतील. त्यानंतर 4 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत क्वॉलिफायर वन, टू, इलिमिनेटर व फायनल या लढती होतील. आयपीएलच्या 12 मोसमांमध्ये अंतिम फेरीचा सामना हा रविवारीच खेळवण्यात आला आहे, पण यंदा फायनल लढत मंगळवारी होणार आहे. दिवाळीच्या सुट्टय़ांवर लक्ष देऊन हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

तीन ठिकाणी होणार लढती

कोरोनामुळे यंदा आयपीएल स्पर्धा हिंदुस्थानात खेळवण्यात येणार नाही. यूएईमध्ये या वर्षी ही स्पर्धा पार पडणार आहे. यूएईतील तीन ठिकाणी या स्पर्धेच्या लढती खेळवण्यात येणार आहेत. अबुधाबीमध्ये 24 सामने, दुबईमध्ये 20 सामने आणि शारजाहमध्ये 12 सामने होणार आहेत. प्ले ऑफ व फायनलबाबत निर्णय नंतर घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या