IPL 2020 – मुंबई प्ले ऑफमध्ये, पण…अजूनही सात संघांचे स्पर्धेतील आव्हान कायम

यूएईमध्ये सुरू असलेल्या ‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 13 व्या हंगामाचा आता उत्तरार्ध सुरू आहे. आतापर्यंत केवळ चेन्नई सुपरकिंग्ज हा एकमेव संघच प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे. उर्वरित सातही संघांचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. गुणतालिकेत 16 गुणांसह अव्वल स्थानावर असलेला मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमध्ये गेल्यात जमा आहे. मात्र जरतरच्या समिकरणावर तांत्रिकदृष्टय़ा अद्यापि इतर चार संघांना गुणतालिकेत मुंबई इंडियन्सच्या पुढे जाण्याची संधी असल्याने या संघाच्या प्ले ऑफमधील प्रवेशावर अधिककृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

‘आयपीएल’मध्ये बुधवारपर्यंत सर्व संघांनी प्रत्येकी 12 साखळी सामने खेळले. यामध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 8 लढती जिंकून 16 गुणांसह गुणतालिकेत आघाडी घेतली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व दिल्ली कॅपिटल्स संघ प्रत्येकी 14 गुणांसह अनुक्रमे दुसऱया व तिसऱया स्थानावर आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब व कोलकाता नाईट रायडर्स हे संघ 12-12 गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स यांच्या खात्यात प्रत्येकी 10 गुण असून ते अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानी आहेत.

पाच संघ शर्यतीत

‘आयपीएल’च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्यासाठी मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स या पाच संघांना संधी आहे. (गुरुवारी होणाऱ्या कोलकाता-चेन्नई लढतीपूर्वीच्या आकडेवारीनुसार) क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे आपणा सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स उर्वरित दोन लढतींत मोठे पराभव पत्करावे लागले आणि इतर लढतीचे निकालही त्यांच्या मनाविरुद्ध लागले तर अव्वल स्थानी असलेल्या हा संघ पाचव्या स्थानावर फेकला जाऊ शकतो. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब होऊ शकलेले नाही. सातव्या स्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सने उर्वरित दोन लढतींत दणदणीत विजय मिळविले आणि इतर लढतींचे निकाल त्यांच्या मनाप्रमाणे लागल्यास या संघालाही 14 गुणांसह प्ले ऑफ गाठण्याची संधी असेल.

आपली प्रतिक्रिया द्या