टीम इंडियाचे शतकांचे ‘महाशतक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने गेल्या काही काळामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. टी-20, वन डे व कसोटी या तिन्ही प्रकारांत ठसा उमटवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरलीय. हिंदुस्थानी संघाच्या या घवघवीत यशामध्ये फलंदाजांसोबत गोलंदाजांचाही मोलाचा वाटा आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावरच मोठी मुसंडी मारता आलीय. याप्रसंगी एकापेक्षा एक असे दिग्गज फलंदाज देणाऱया हिंदुस्थानने गेल्या दशकांत फलंदाजीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2010 ते 2019 या कालावधीत 122 शतके झळकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानने वन डे क्रिकेटमध्ये मोठी झेप घेतली आहे.

मागील तिन्ही दशकांत टॉपवरच

हिंदुस्थानी संघात अव्वल दर्जाचे फलंदाज एकामागोमाग एक येतच राहिले. त्यामुळे गेल्या तिन्ही दशकांत सर्वाधिक शतके हिंदुस्थानकडूनच झळकावली गेली. 1990 ते 1999 या कालावधीत हिंदुस्थानच्या फलंदाजांनी 64 शतके झळकावली होती. त्यानंतर 2000 ते 2009 या दशकांत टीम इंडियाकडून 88 शतके झळकावली गेली. या दशकांत ऑस्ट्रेलियन संघ 82 शतकांसह दुसऱया स्थानावर होता आणि 2010 ते 2019 सालामध्ये हिंदुस्थानने 122 शतकांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.