हिंदुस्थान उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचा 74 धावांनी धुव्वा

साखळी लढतींत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱया गतजगज्जेत्या हिंदुस्थानने मंगळवारी ऑस्ट्रेलियाचाही 74 धावांनी धुव्वा उडवून युवा विश्वचषक (19 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. यशस्वी जैस्वाल व अथर्व अंकोलेकर यांची झुंजार अर्धशतके आणि कार्तिक त्यागी, आकाश सिंग यांची अफलातून गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. चार बळी टिपणारा कार्तिक त्यागी सामन्याचा मानकरी ठरला.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 234 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 43.3 षटकांत केवळ 159 धावसंख्येवर संपुष्टात आला. सलामीवीर सॅम फॅनिंगने 75 धावांची खेळी करीत एकाकी झुंज दिली. पॅट्रिक रॉवे (21) व लिएम स्कॉट (35) वगळता तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही, तर इतर फलंदाज एकेरी धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. हिंदुस्थानकडून कार्तिक त्यागीने 24 धावांत 4, तर आकाश सिंगने 30 धावांत 3 फलंदाज बाद केले. रवी बिश्नोईला एक बळी मिळाला.
त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना युवा हिंदुस्थान संघाने 9 बाद 233 धावसंख्येपर्यंत मजल मारली. यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. त्याने 82 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार लगावले. मात्र दुसऱया बाजूने दिव्यांश सक्सेना (14), तिलक वर्मा (2), कर्णधार प्रियाम गर्ग (5) व धृव जुरेल (15) ही मधली फळी अपयशी ठरल्याने हिंदुस्थानची अवस्था 6 बाद 144 अशी झाली. त्यानंतर सिद्धेश वीर (25), अथर्व अंकोलेकर (नाबाद 55) व रवी बिष्णोई (30) यांनी उपयुक्त फलंदाजी केल्याने हिंदुस्थानला सवादोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. अंकोलेकरने नाबाद 55 धावा करताना 5 चौकार व एका षटकार लगावला. ऑस्ट्रेलियाच्या केल्ली व मर्फी यांनी 2-2 फलंदाज बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या