17 वर्षीय यशस्वीचे विक्रमी द्विशतक; सचिन, सेहवान, रोहितच्या पंक्तीत स्थान

300

17 वर्षीय यशस्वी जैसवाल याने बुधवारी बंगळुरूत विक्रमी द्विशतक झळकावले. मुंबईच्या या पठ्ठय़ाने 154 चेंडूंत 12 खणखणीत षटकार व 17 नेत्रदीपक चौकारांचा पाऊस पाडत 203 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. याप्रसंगी संस्मरणीय द्विशतक करणारा तो लिस्ट ए क्रिकेटमधला सर्वात युवा फलंदाज ठरलाय. यशस्वी जैसवालच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर मुंबईने विजय हजारे ट्रॉफीतील एलिट ‘अ’ गटातील लढतीत झारखंडवर 39 धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने आठ सामन्यांमधून चार विजयांसह 20 गुणांची कमाई केली आहे.

विराट सिंगची शतकी खेळी, धवलचे 5 बळी

मुंबईकडून मिळालेल्या 359 धावांचा पाठलाग करणाऱया झारखंडने 319 धावा केल्या. विराट सिंगने 77 चेंडूंत 2 षटकार व 12 चौकारांसह 100 धावा तडकावल्या. सौरभ तिवारीने 77 धावांची आणि अनुकूल रॉयने 46 धावांची खेळी साकारली. मुंबईकडून धवल कुलकर्णी या अनुभवी गोलंदाजाने झारखंडचा निम्मा संघ गारद केला. त्याने 37 धावा देत 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

वन मॅन शो

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैसवाल याने ‘वन मॅन शो’ करीत झारखंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने अनुभवी आदित्य तरे (78 धावा) याच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी रचली. अनुकूल रॉयने आदित्य तरेला बाद करीत जोडी फोडली. त्यानंतर यशस्वी जैसवालने सिद्धेश लाडच्या (32 धावा) साथीने 105 धावांची भागीदारी केली. विवेकानंद तिवारीने सिद्धेश लाडला बाद केले. विवेकानंद तिवारीनेच यशस्वी जैसवालला बाद केले. कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद 31 धावा केल्या. मुंबईने 50 षटकांत 3 बाद 358 धावा तडकावल्या.

दृष्टिक्षेपात

  • यशस्वी जैसवाल याने लिस्ट ए क्रिकेटमधील नववे द्विशतक झळकावले. याआधी रोहित शर्मा (तीन), सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग (दोघांनी प्रत्येकी एक) यांनी वन डेत द्विशतके झळकावली आहेत. शिखर धवनने हिंदुस्थान ‘अ’ संघासाठी खेळताना द्विशतक झळकावले. तसेच के. व्ही. कौशल व संजू सॅमसन यांनीही विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक साजरे केले आहे. संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 212 धावा तडकावल्या आहेत.
  • यशस्वी जैसवाल याने विजय हजारे ट्रॉफीतील पाचपैकी तीन लढतींमध्ये शतके झळकावली आहेत. याआधी गोवा व केरळ यांच्याविरुद्ध त्याने शतके ठोकलीत.
  • गेल्या वर्षी पार पडलेल्या आशिया कप या स्पर्धेद्वारे यशस्वी जैसवाल पहिल्यांदा नावारूपाला आला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने शानदार फलंदाजी केली होती. तसेच संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याने 318 धावा तडकावल्या होत्या.
  • या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या तिरंगी वन डे मालिकेत त्याने सात सामन्यांमधून चारमध्ये अर्धशतक झळकावली होती.
आपली प्रतिक्रिया द्या