
बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. एका 22 वर्षीय तरुणाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने अवघ्या तीन वर्षांच्या पुतणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (03 एप्रिल 2026) रात्री उशिरा घडला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगी घरात झोपलेली असताना तिचा व्यसनी काका तिला उचलून घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या एका शेतात घेऊन गेला. तिथे त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी चिमुरडीवर अत्याचार केले. Times of India ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. सुरुवातीला परिसरात मुले चोरणारी टोळी आल्याचा समज झाल्याने लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. लोकांचा वाढता दबाव पाहून तिन्ही नराधम मुलीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तिथून पसार झाले. शोधाशोध करत असलेल्या कुटुंबाला मुलगी गंभीर अवस्थेत सापडताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तत्परता दाखवत मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या काकाला आणि त्याच्या एका मित्राला अटक केली आहे, तर तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रंजन कुमार यांनी सांगितले की, “गुन्ह्याच्या ठिकाणाहून पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल (FSL) टीमला पाचारण करण्यात आले आहे. पीडित मुलगी आणि तिच्या आईचे जबाब न्यायालयात नोंदवले जातील, जेणेकरून या प्रकरणाचा खटला जलदगतीने चालवून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देता येईल.”

























































