पुणे शहरात तीन ठिकाणी घरफोडी, 9 लाखांचा ऐवज लंपास

शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन ठिकाणांहून 9 लाखांचा ऐवज चोरून नेला. मॉडेल कॉलनी, खडकी बाजार आणि हडपसर परिसरातील फ्लॅटमध्ये चोरी करीत चोरट्यांनी डाव साधला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी, खडकी व हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी दिवसाढवळ्या खडकी बाजार परिसरातील निता कॅर्नर एलफिस्टन रोड बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिणे व रोकड असा तब्बल 6 लाख 17 हजार 275 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 8 जूनला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली असून याप्रकरणी भावेश शांतिलाल नहार (वय 41) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भावेश यांचे शनिवार पेठेत दुकान आहे. घर बंद करून ते दुकानात गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाज्याचे लॉक तोडून कपाटातील दागिणे व रोकड चोरी केला. त्यानंतर संध्याकाळी भावेश नहार घरी आले असता, त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी मॉडेल कॉलनीतील गोदामातून दोन मायक्रोवोव्हन, दोन कुलर व दोन एसी असा 1 लाख 59 हजार 760 रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना 8 जूनला घडली असून निलेश गोठी (वय 45,रा. कर्वेनगर) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याशिवाय चोरट्यांनी हडपसरमधील वेताळबाबा वसाहतीतील घराचे कुलूप तोडून पेटीत ठेवलेले 1 लाख 32 हजाराचे दागिणे चोरी केले. याप्रकरणी ताराबाई नागे (वय 63) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या