अजितदादांच्या गुंड उमेदवारांमुळे पुण्यात गुन्हेगारी वाढणार; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची टिका

पुणे शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे असे पालकमंत्री अजित पवार सांगतात. मात्र, त्यांच्या पक्षाची उमेदवारी यादी पाहिली तर गुन्हेगारांचा समावेश दिसतो. हे कोणत्या तत्त्वात बसते त्यांनी सांगावे. गुंडाच्या उमेदवारीमुळे पुण्यात आणखी गुन्हेगारी वाढणार आहे, अशी टीका पेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली.

भाजपच्या मीडिया सेलचं उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री चंद्रकांत पाटील, प्रवत्ते केशव उपाध्ये, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

राष्ट्रवादीसह भाजपकडून पुण्यात गुन्हेगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, गुन्हेगार यांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही सकारात्मक नाही. वार्ड क्रमांक 38 मध्ये रोहिदास चोरघे यांच्या पत्नी प्रतिभा चोरघे या अनेक वर्षे सामाजिक काम करत आहेत. चोरघे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मला माहिती नाही. परंतु गुन्हेगार यांना राजकारणात स्थान नसावे. मात्र, एकीकडे पालकमंत्री सांगतात की, शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे; पण त्यांची शहरातील दोन्ही टोकांपासून उमेदवारी यादी पाहिली तर गुन्हेगारांचा समावेश दिसेल. हे कोणत्या तत्त्वात बसते हे  त्यांनी सांगावे. पुणेकर मतदार मतपेटीमधून त्याचे उत्तर देतील.

एका नगरसेवकाच्या जिवावर शिंदे गटाची स्वबळाची भाषा

2017 मध्ये भाजपचे 105 नगरसेवक असातानाही आम्ही युतीत लढणार असल्याचे सांगत होतो. शिंदे गटाबरोबर युती राहावी अशी आमची भूमिका आहे. मात्र, शिंदे गट एका नगरसेवकाच्या जिवावर सर्व जागा लढायची भाषा करत होता, असा टोला मोहोळ यांनी शिंदे गटाला लगावला. अजूनही युतीची भूमिका असून वरिष्ठ नेते चर्चा करत सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.