पाऊस लवकर पडला नाही तर कठीण परिस्थिती; धरणांत उरले केवळ 13 टक्के पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

यंदा पाऊस 17 जूनपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. आणखी लांबला तर  राज्याची अवस्था आणखी बिकट होणार आहे. कारण सध्या 13 ते 28 मेपर्यंतच्या वस्तुस्थितीनुसार राज्यातील विविध धरणांत केवळ 13.1 टक्के इतकेच पाणी उरले असून टँकरची संख्याही 5,493 ते 6,209 पर्यंत वाढली आहे. यावरून येथील परिस्थिती किती भयंकर आहे हे दिसून येत आहे. गेल्या वर्षी 28 मेपर्यंत विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या 1,622 इतकी होती. मराठवाडय़ात केवळ 2.9 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मराठवाडय़ाला तर भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.

28 हजार गावांमध्ये भीषण दुष्काळ

मराठवाडय़ातील 28 हजार गावांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोठय़ा संख्येने खासगी कंत्राटदार गावांमध्ये टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करत आहेत. गेल्या आठवडय़ात विविध गावांमधील टँकर्सची संख्या मोजण्यात आली त्यानुसार 4,331 टँकर्सची तर विविध खेडय़ांमध्ये तब्बल 9470 टँकर्सची नोंद झाली.

राज्यातील 45 धरणे कोरडी

राज्यभरातील तब्बल 45 धरणांमधील पाण्याची पातळी शून्य पातळीपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे ही धरणे अक्षरशः कोरडीठाक पडल्याचे चित्र आहे अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्याचा पुरवठा गावांना टँकरद्वारे करण्यात येत आहे, मात्र लवकर पाऊस पडला नाही तर परिस्थिती अत्यंत भयंकर होणार आहे.

  • यंदा 27 मेपर्यंत 13.1 टक्के इतका पाणीसाठा धरणांमध्ये असल्याची नोंद झाली. गेल्या वर्षी 23.1 टक्के पाणीसाठा होता.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या जलयुक्त शिवार योजनेचाही पावसाअभावी फारसा फायदा झालेला नाही. पाच वर्षांपूर्वी ही योजना अमलात आणण्यात आली होती, परंतु पाऊसच नसल्यामुळे अनेक शिवारे कोरडीठाक पडली आहेत.
  • राज्यभरात 1,501 चारा छावण्या उभारण्यात आल्या असून त्यात साडेदहा लाख गुरांची व्यवस्था कण्यात आली आहे. त्यासाठी संभाजीनगरमध्ये 11 कोटी, पुण्यासाठी 4 कोटी आणि नाशिकसाठी 47 कोटी खर्च करण्यात आला आहे.