
शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड-तेरवाड दरम्यान जुन्या रस्त्यावरील पंचगंगा नदीच्या धरणाजवळ असणाऱ्या संजय सौंदते यांच्या उसाच्या शेतात सुमारे 9 फूट लांबीची 350 किलो वजनाची मगर शेतकऱ्यांनी धाडसाने पकडली. व ती वनविभागाच्या ताब्यात दिली. पंचांगगा नदी काठच्या जवळील शेतात मगर पकडण्यासाठी शेतकऱ्याने तब्बल एक तास अधिक काळ थरार सुरू ठेवला होता. रस्त्यापासून हे ठिकाण जवळ असल्याने बघ्यांची यात्रेसारखी गर्दी झाली होती. मगर आढळून आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यातील तेरवाड धरणाजवळ पंचगंगा नदीतून अंदाजे दहा वर्षे वय असलेली मगर भरकटत सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या संजय सौंदते यांच्या शेतात आली. सौंदते यांना 9 फूट लांबीची आणि जवळपास 350 किलो वजनाची मगर शेतातून नदीकडे जाताना दिसली. या घटनेची माहिती त्वरित पोलीस आणि वनविभागाला कळवण्यात आली. यावेळी येथील शेतकरी सिकंदर कोठीवाले, अमोल कुंमटाळे,प्रथमेश डाफळे, बाळू मुल्ला, राकेश पाटील, रोहित पाटील, अण्णाप्पा बंडगर, रमजान जमादार, शैलेश कांबळे, अमोल खोत आदींनी मगरीचा शोध घेऊन सकाळी नऊ वाजता मगरीला जेरबंद केले.
वनखात्याचे अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने शेतातून मगर आणून वाहनात ठेवली. जयसिंगपूर येथे मगरीची मेडिकल तपासणी करून जलाशयात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली.

























































