
जिह्याच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुके, ढगाळ वातावरणानंतर आता महिनाभरात दुसऱ्यांदा अवकाळीने द्राक्षबागा, कांदा, कांदा रोपे, रब्बी पिकांचे नुकसान केले. या तडाख्यातून पिके जगवायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
सटाणा तालुक्यातील वटार, साल्हेर, हरणबारी; निफाडच्या पिंपळगाव बसवंत, ओझर; देवळा तालुक्यातील खर्डे व परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाऊस पडला. नाशिकरोड भागातही सायंकाळी त्याने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात आज मध्यरात्री एकच्या सुमारास मध्यम ते तुरळक सरी बरसल्या. सकाळी देखील शहरासह जिह्याच्या काही भागात पाऊस पडला.
आधी परतीचा लांबलेला पाऊस, नंतर 4 व 5 डिसेंबरला अवकाळी बरसला. नंतर पुन्हा थंडी, ढगाळ, धुके असे बदलते वातावरण द्राक्षबागांसाठी हानीकारक ठरले. त्यात आता पुन्हा अवकाळीचे संकट ओढावल्याने हाही द्राक्ष हंगाम उत्पादकांना कर्जाच्या खाईत ढकलणारा ठरला आहे. कांद्यालाही महिनाभरात दुसऱ्यांदा अवकाळीचा तडाखा सहन करावा लागला, यामुळे उत्पादनात मोठी घट जाणवणार आहे.
बदलत्या वातावरणाचा मोठा फटका गहु, हरबरा, आंबा यांना बसला आहे. द्राक्ष बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने औषध फवारणीशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे आर्थिक बोजा वाढत चालल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रविवारी आणि सोमवारी ढगाळ वातावरण कायम राहील. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. ते आज 18.5 अंश सेल्सिअस होते, ते 3 जानेवारीपर्यंत 14 अंशांवर घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.