पाण्याअभावी पिकं करपायसा लागली, शेतकरी भयंकर चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, येरोळ

लातूर जिल्ह्यातील येरोळ परिसरातील गावामध्ये तीव्र उन्हामुळे सोयाबीनसह सर्व खरीप पिके करपायला लागली आहे. २५ दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर आर्थिक संकटाची अंधारी यायला लागली आहे.

पावसाअभावी पिके करपली, बळीराजा संकटात

लातूर जिल्ह्यातील येरोळ, दैठणा, डिगोळ, सुमठाणा, चामरगा, कारेवाडी बोळेगाव, पांढरवाडी या गावांमध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे. गेल्या दोन महिन्यात ऊन पावसाचा लपंडाव सुरू होता. जो पाऊस पडायचा तो पिकांसाठी अत्यंत थोडा होता. त्यातच गेल्या महिन्यात सोयाबीनवर करपा रोग पडला. कृषी विभागाच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी रोगापासून सुटका मिळवण्यासाठी मोठा खर्च करून फवारणी केली. दरम्यान पाऊस पूर्णपणे बंद झाला आणि आता पिकं करपायला सुरुवात झाली आहे. शेतातील सोयाबीन डोळ्यापुढे करपून चालल्याचे पाहावत नसल्याचे शेतकरी माधव मल्लीशे, सोमेश्वर पाटील, विश्वनाथ सिंदाळकर, बालाजी चौष्सठे, धर्मराज चावरे, काशीनाथ हासणाबादे, भाऊराव पाटील, मधूकर बालवाड, प्रल्हाद बिरादार, वैजनाथ साकोळकर, सुनिल बरदाळे, राजेद्र चेबाळे, शंकर पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले. प्रशासनानतील वरिष्ठ तालुका व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी ऑफीसातल्या खुर्च्या सोडून एकदा शेतकऱ्यांची हाक ऐकून शेतशिवाराची पाहणी करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.