एआय समिटमध्ये गर्दी, गोंधळ आणि चोऱ्यामाऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 दिल्लीतील सुरू झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटचा पहिलाच दिवस प्रचंड गर्दी, गोंधळ आणि गैरसोयींचा ठरला. ढिसाळ व्यवस्थापनाचा मोठा फटका समिटमध्ये सहभागी झालेले मान्यवर व नागरिकांना बसला. इतकेच नव्हे, चोरीच्याही घटना घडल्या. ‘भारत मंडपम’मधील गर्दीचा फायदा घेत चोरटय़ांनी अनेक वस्तू लांबवल्या. या गोंधळावरून पेंद्र सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या निरीक्षणाखाली ही शिखर परिषद होत आहे. परिषदेत सहभागी होणाऱयांची क्यूआर कोडद्वारे नोंदणी करण्यात आली होती. समिट सुरू होण्याआधीच अडीच लाख लोकांनी नोंदणी केली होती. हा आकडा कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेपेक्षा जास्त होता. भारत मंडपममध्ये होणाऱया व्यापार मेळय़ाला दरवर्षी दिवसभरात 1 लाख लोक हजेरी लावतात. मात्र, एआय समिटच्या पहिल्या दिवशी एकाच वेळी 80 हजार लोक आले. त्याच वेळी अति महत्त्वाच्या व्यक्तीही तिथे आल्या. त्यामुळे गोंधळात अधिकच भर पडली.

गैरसोयींची ‘शिखर’ परिषद

इंटरनेट सेवा कोलमडलेली
प्रदर्शन दालनांपुढे लांबच लांब रांगा
पाणी, जेवणाचीही सोय नव्हती
लॅपटॉप्स, पॅरीबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मनाई
डिजिटल पेमेंटची व्यवस्था नव्हती. पॅश पेमेंटची सक्ती

काँग्रेसचा हल्ला

एआय समिटमधील गोंधळावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘ही समिट म्हणजे जगाला हिंदुस्थानच्या एआय आणि डिजिटल क्षमतेची ताकद दाखवण्याची संधी होती. मात्र, प्रसिद्धीसाठी भुकेलेल्या सरकारने ती घालवली. आजच्या प्रकारामुळे हिंदुस्थानचे जगात हसे झाले आहे,’ असा संताप खरगे यांनी व्यक्त केला. अशा भव्य परिषदांचे आयोजन कसे करायचे हे मोदी सरकारने ‘बेंगळुरू टेक समिट’मधून शिकायला हवे,’ असा टोलाही हाणला.