सुरक्षा दलाच्या छावणीवर वीज कोसळली, सीआरपीएफच्या एका जवानाचा मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

झारखंडच्या पश्चिमी सिंहभूमी जिल्ह्यातील सारंडा जंगलात सुरक्षा दलाच्या छावणीवर वीज कोसळल्याने सीआरपीएफ चार जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने किरीबुरु आणि नोआमुंडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व जवान नक्षलग्रस्त भागात मोहिमेवर तैनात होते.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास सारंडा येथील बालीबा परिसरात सीआरपीएफ 26 बटालियनच्या छावणीवर वीज कोसळली. या घटनेत सीआरपीएफचे सेकंड-इन-कमांड एमपी सिंग, असिस्टंट कमांडंट सुबीर मंडल आणि झारखंड पोलीस व जग्वारचे एएसआय सुदेश आणि एएसआय चंदन हंसदा जखमी झाले.

सीआरपीएफचे सेकंड-इन-कमांड एमपी सिंग यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सिंग हे मणिपूरमधील परेलचे रहिवासी होते. परिसरातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्यात सिंग हे महत्त्वाची भूमिका बजावत होते.

घटनेची माहिती मिळताच किरीबुरु-मेघाहातुबुरु रुग्णालयातून तात्काळ ऑक्सिजन सिलिंडर आणि प्रथमोपचार उपकरणांनी सुसज्ज मदत पथक रवाना करण्यात आले. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी सैनिकांची प्रकृती गंभीर असल्याचे कोल्हाणचे डीआयजी मनोज रतन चौथे यांनी सांगितले.