अखेर सीएसएमटीची बकरी चालली मुर्शिदाबादला, अडीच हजारांत लिलाव

सामना प्रतिनिधी, मुंबई

मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर स्थानकात मालकाने टीसीला घाबरून सोडून दिलेल्या ‘बसंती’ नावाच्या एका बकरीचे पालकत्व रेल्वे अधिकाऱयांना करावे लागल्याने ती चांगलीच चर्चेत आली होती. गुरुवारी या बकरीचा अखेर लिलाव करण्यात आला. मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असलेल्या अब्दुल रहमान यांनी बकरी अडीच हजारांत लिलावात खरेदी केली असून तिची रवानगी आता पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथील खेडेगावात होणार आहे.

बकरीसह फिरणाऱया एका प्रवाशास मस्जिद बंदर स्थानकात टीसीने तिकिटाची मागणी करताच तो त्याची बकरी दंडाच्या भीतीने तेथेच टाकून पळाला. या बकरीचा सीएसएमटी येथील पार्सल विभागाजवळ दोन दिवस पाहुणचार करण्यात आला. रेल्वे स्थानकावर बकरी कुठून आली या विचाराने प्रवासीही आश्चर्यचकित झाले होते. अखेर गुरुवारी लिलावासाठी काही उत्सुक व्यक्ती पुढे आल्या होत्या.

त्यातील एकाने दोन हजार रुपयांची बोली लावली. पण तेव्हाच अब्दुल रहमान यांनी अडीच हजार रुपयांची बोली लावली. त्यावेळी सर्वात जास्त बोली असल्याने रहमान यांना बकरीचा ताबा देण्यात आला. कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण करून रहमान यांनी बकरीचा ताबा घेतला. या बकरीचा सांभाळ करणार असल्याचेही रहमान यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या पॅकेजिंग आदी कामे करणारे रहमान हे पश्चिम बंगाल आणि मुंबई असा प्रवास करतात.