करी रोड, एल्फिन्स्टन ब्रिज १५ दिवसांसाठी ‘वन वे ’

सामना प्रतिनिधी । मुंबई

वाहनांनी सदैव गजबजलेल्या करी रोड आणि एल्फिन्स्टन पुलावरील वाहतुकीत पोलिसांनी बदल केला आहे. आजपासून १५ जूनपर्यंत या पुलावरील वाहतूक वन वे केली आहे. अचानक पोलिसांनी हा प्रयोग हाती घेतल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून पाच मिनिटांच्या प्रवासाकरिता १५ ते २० मिनिटे प्रवास करीत वळसा मारून इच्छितस्थळी जावे लागत आहे.

वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी करी रोड आणि एल्फिन्स्टन पुलावरील वाहतुकीत १५ दिवसांसाठी बदल केला आहे. प्रभादेवी, एल्फिन्स्टनला जाण्यासाठी करी रोड पूल हा वन वे केला असून त्या ठिकाणाहून हिंदमाता, परळमध्ये येण्यासाठी एल्फिन्स्टन पूल वन वे केला आहे. आजपासून १५ दिवस २४ तासांसाठी हा प्रयोग हाती घेण्यात आला आहे, मात्र हे गैरसोयीचे असल्याचे म्हणत या वन वेविरोधात एल्फिन्स्टन येथील नागरिकांनी सायंकाळी एल्फिन्स्टन पुलाजवळ आंदोलन केले.