आवडत्या हीरोचा चित्रपट पाहण्यासाठी असंख्य चाहते तिकीट काऊंटरवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत व्हावी यासाठी चित्रपटाचे ऑनलाइन तिकीट बुक करतात, परंतु चित्रपटाचे ऑनलाइन तिकीट बुकिंग उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना चांगला चुना लावत आहेत. बुक माय शो आणि पीव्हीआर यासारख्या आघाडीच्या कंपन्या गुपचूप ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेत असल्याची माहिती लोकल सर्कलच्या एका सर्व्हेतून समोर आली आहे.
पीव्हीआर आणि बुक माय शो तिकीट खरेदी करताना ग्राहकांकडून सोशल डोनेशन किंवा अन्य वेगळ्या पद्धतीने ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात आहेत, याची माहिती अनेकांना सांगितली जात नाही. या सर्व्हेत 73 टक्के लोकांनी सांगितले की, ते बास्केट स्नीकिंगचे बळी ठरले आहेत. बास्केट स्नीकिंगमध्ये कंपन्या ग्राहकांना न विचारताच त्यांच्या कार्टमध्ये बिनदिक्कतपणे एक्स्ट्रा चार्ज जोडतात. जवळपास 80 टक्के लोकांनी सांगितले की, तिकीट बुकिंग करताना त्यांना हे चार्ज द्यावे लागले आहेत. तसेच 62 टक्के लोक तिकीट बुक करताना अनावश्यक मेसेजचे बळी पडले आहेत. तुम्ही जर लवकर तिकीट बुक केले नाही तर तुम्हाला पश्चाताप होईल, असे या मेसेजमध्ये म्हटले जाते. हा सर्व प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू आहे. याला हजारो लोक बळी पडले आहेत.
कंपन्यांची गुपचूप चलाखी
या सर्व्हेत देशातील 296 जिह्यांतील जवळपास 22 हजार लोकांशी संवाद साधण्यात आला. यात 61 टक्के पुरुष आणि 39 टक्के महिला सहभागी झाल्या होत्या. मुंबईसारख्या प्रमुख शहरात 44 टक्के, तर अन्य शहरात 44 आणि 31 टक्के लोकांनी या सर्व्हेत भाग घेतला. या सर्व्हेमध्ये वेगवेगळे चित्रपट आणि इव्हेंट तिकीटसंबंधी विचारणा करण्यात आली होती. बुक माय शो बास्केट स्नीकिंग, ड्रिप प्रायसिंग आणि अनावश्यक एजन्सीचे ट्रिक करायला भाग पाडते, तर पीव्हीआर बास्केट स्नीकिंग आणि ड्रिप प्रायसिंग करायला सांगते.