ड जीवनसत्त्व आणि मानसिक आरोग्याचा आहे परस्परसंबंध.. कसा ते वाचा?

लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींमध्ये हाडांची घनता राखण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे. लठ्ठपणा आणि तीव्र आजार असलेल्यांना या सूर्यप्रकाशाच्या जीवनसत्त्वाची कमतरता जास्त असते. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे चयापचय विकार, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, श्वसन विकार, फुड अॅलर्जी आणि दमा यासारख्या आरोग्याच्या समस्येचा धोका उदभवू शकतो.

तसेच हाडे ठिसूळ होणे, फ्रॅक्चर होणे या देखील समस्या जाणवतात. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन डीचा अभाव देखील मानसिक आरोग्यवर दुष्परिणामकारक ठरते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे निराशा आवश्यकतेपेक्षा अधिक वाढते. आपण क्षुल्लक गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्याने आपल्याला मानसिक त्रास होतो.

विविध अभ्यासानुसार या सूर्यप्रकाशाच्या जीवनसत्त्वाची कमतरता मानसिक विकारांशी संबंधित आहे. विविध अभ्यासानुसार नैराश्य, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, ओसिडी सारखे मानसिक आरोग्याशी संबंधित आजार हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंन्ट्सच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात. तसे बऱ्याच अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अनेक व्यक्ती नैराश्याने ग्रासले आहेत.

यामागचे कारण म्हणजे व्हिटॅमिन डी रिसेप्टर्स संपूर्ण मानवी मेंदूमध्ये पसरलेले आहेत आणि त्यातील निम्न पातळी ही आपल्याला मानसिक विकारांचा बळी ठरवू शकते. व्हिटॅमिन डी ची कमतरता ही जागतिक आरोग्य समस्या आहे आणि त्यातील उच्च किंवा कमी पातळी या समस्येचे कारण ठरु शकते. आपल्याला आहार किंवा पूरक आहारांद्वारे ड जीवनसत्वाचे योग्य प्रमाणात सेवन करण्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे.

कमी व्हिटॅमिन डी केवळ आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करत नाही तर उच्च रक्तदाबेशी देखील जोडला जातो. व्हिटॅमिन डीची निम्न पातळी हायपरटेन्शनशी जोडली जाते. अशा प्रकारे, योग्य व्हिटॅमिन डी चे योग्य प्रमाणात सेवन करणे उच्च रक्तदाबाची समस्या दूर ठेवण्यास मदत करू शकते. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शिवांगी पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

पुरेसे व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

व्हिटॅमिन डी असलेल्या पदार्थांची निवड करा – योग्य वजन राखणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन आहारात सॅमन, मॅकेरल, सारडिन, मशरूम, अंड्यातील पिवळ बलक, आणि तृणधान्ये, कमी चरबीयुक्त डेअरी उत्पादने समाविष्ट करणे गरजेचे आहे. शरीरात दाह निर्माण करणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नका.

ड जीवनसत्वाचे अचूक प्रमाणात सेवन करा – आपल्याकडे व्हिटॅमिन डी पूरक आहार किती प्रमाणात असणे आवश्यक आहे याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोला. वेळोवेळी व्हिटॅमिन डीची पातळी तपासा. गरजेपेक्षा अधिक प्रमाणात विटामिन डी चे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.

मुबलक सूर्यप्रकाश मिळवा – व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळविण्याकरिता सर्वात उत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशात अधिक काळ घालविणे देखील धोकादायक ठरू शकते याची नोंद घ्या.

आपली प्रतिक्रिया द्या