दाभोळ पॉवरने आयात केलेल्या विद्युत यंत्रसामग्रीची बिलेच सापडेनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाभोळ पॉवर कंपनीने परदेशातून आयात केलेल्या तब्बल 21 कोटी रुपये किंमतीच्या विद्युत यंत्रसामग्रीची बिलेच सापडत नसल्यचे समोर आले आहे. सदर आयात वस्तूंची किंमत परकीय चलनाच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यामुळे बिलाची एक्सचेंज कॉपी रिझर्व्ह बँकेला देणे बंधनकारक असतानाही गेल्या वीस वर्षांत दिलेली नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्याविरोधात दाभोळ पॉवर कंपनीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

दाभोळ पॉवर कंपनीने 1998 ते 2001 या कालावधीत सुमारे 21 कोटी 29 लाख रुपयांची विद्युत यंत्रसामग्री मदतीने आयात केली आहे. कस्टम विभागाच्या मदतीने आयात केलेल्या या सामग्रीची 17-18 बिले असून त्याच्या प्रत्येकी सहा कॉपी असतात. त्यापैकी तीन कॉपी कस्टम विभागाकडे ठेवल्या जातात, तर एक कॉपी आयातदार, बँकर्सकडे जाते. तर एक्सचेंज नावाने ओळखली जाणारी बिलाची सहावी कॉपी आयातदार आणि बँकर्सने रिझर्व्ह बँकेला देणे बंधनकारक आहे. मात्र सदर कॉपी रिझर्व्ह बँकेपर्यंत पोहचलेली नाही. त्याची रिझर्व्ह बँकेने त्याची गंभीर दखल घेतली असून बिलाची एक्सचेंज कॉपी न मिळाल्याने सदर सामग्री खरंच आयात केली आहे का, असा सवाल करत याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश अंमलबजावणी संचलनालयाला दिले आहेत. त्यानुसार ईडी चौकशी करत असून सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे.

आता बिलाची कॉपी आणायची कुठून?

आयात केलेल्या विद्युत यंत्रसामग्रीचे जे बिल कस्टमकडून आयातदाराला दिले जाते ती बिले दाभोळ पॉवर कंपनीकडे आहेत; पण रिझर्व्ह बँकेला द्यावे लागणारे एक्सचेंज बिल ना दाभोळ कंपनीकडे आहे, ना बँकेकडे आहे. त्यामुळे आता एक्सचेंज बिलाची कॉपी आणायची कुठून, असा सवाल दाभोळ पॉवर कंपनीशी संबंधित एका अधिकाऱयाने केला आहे.