
पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनला अचानक जोराचा झटका बसला आणि आतील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. ट्रेनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाने हा गोंधळ उडाला. दादर रेल्वे स्थानकात सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. यादरम्यान अनेक प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि त्यांनी दुसऱया ट्रेनमधून पुढील प्रवास केला. ट्रेनमधील तांत्रिक बिघाडाच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला.
बोरिवली रेल्वे स्थानकातून सोमवारी सायंकाळी 4.50 वाजता सुटलेली चर्चगेट जलद लोकल सायंकाळी 5.33 वाजता दादर स्थानकात आली होती. गाडी प्लॅटफॉर्मवर येताच अचानक काही तांत्रिक बिघाड झाला आणि गाडीला जोराचा झटका बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. जोरदार झटका बसल्यानंतर गाडी थांबली. नंतर झटके देतच गाडी पुढे चालली. त्यामुळे गाडी सुरू झाल्यानंतरही भीतीपोटी काही प्रवासी खाली उतरले. या गोंधळात काही प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडता पडता वाचले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.






























































