एका तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या आरोपी तयारीत होता. कोणाला समजू नये यासाठी ट्रॉली बॅगेत मृतदेह भरून तो दादर स्थानकात आणला. पण आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आरोपींचा कट फिसकटला आणि पायधुनी येथे रविवारी रात्री झालेल्या हत्येच्या गुह्याचा उलघडा झाला. आरोपी आणि मृत तरुण एकमेकांचे मित्र होते. तसेच तिघेही मुक व कर्ण बधिर आहेत.
रेल्वे सुरक्षा बलाचा जवान संतोषकुमार यादव (39) हे दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 11 वर गस्त घालत असताना एक तरुण मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात असल्याचे त्यांच्या नजरेस पडला. त्यामुळे यादव यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात रक्ताने माखलेला तरुणाचा मृतदेह सापडला. याबाबत तत्काळ दादर रेल्वे पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता तो मृतदेह कलिना येथे राहणाऱया अर्शद अली सादिक अली (30) या तरुणाचा असल्याचे समोर आले. मृतदेहाच्या डोके आणि शरीरावर हातोडय़ाचे घाव घातल्याचे आढळून आले. अर्शदची हत्या झाली असून ती पायधुनी परिसरात झाली असल्याचे समोर येताच सदरचा गुन्हा पायधुनी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पायधुनी पोलिसांनी तपास केला असता शिवजित सिंग याने त्याचा मित्र यश चावडा याच्या मदतीने अर्शदची हत्या केली. किका स्ट्रिट येथील चावडाच्या घरात दोघांनी मिळून अर्शदच्या डोके आणि शरीरावर हातोडय़ाने घाव घालून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चावडाला पकडल्यानंतर पोलिसांनी उल्हासनगर येथून शिवजितला पकडले. हत्या केल्यानंतर मृतदेह मोठय़ा ट्रॉली बॅगेत भरून त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चावडा घेऊन चालला होता. पण तो दादर स्थानकात पकडला गेला. तिघेही मित्र होते. पण दोघांनी मिळून अर्शदची हत्या केली. अर्शद तसेच आरोपी मूक व कर्णबधिर असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले.