मुद्दा : घाट रस्त्यांच्या दुरुस्तीसोबतच चालकांचे प्रबोधन व्हावे!

28 जुलै दापोलीत आंबनेळी घाटात भीषण अपघात, 33 जणांचा मृत्यू

>>दादासाहेब येंधे<<

आंबेनळी घाटातील अपघातावरून एक लक्षात येते की, चालकाचा अति आत्मविश्वास आणि वाहन चालवताना वाहनावर लक्ष केंद्रित न करता, प्रवाशांच्या हास्यविनोदात सामील होण्यामुळे हा प्रकार घडलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे ऐनवेळी घेतलेला शॉर्टकट या सहलीला महागात पडला आणि ३३ मृतांची कुटुंबे अडचणीत सापडली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अपघात झाला, तो परिसर अपघात प्रवणक्षेत्रात येत नाही. तरीही हा अपघात झाला. चालकाला वाहन चालवताना प्रवाशांनी कधीही डिस्टर्ब करायचे नसते. वाहन चालवताना चालकाशी बोलू नये हे साधे नियम असतात. पूर्वी राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनच्या पाठीमागे सूचना लिहिलेली असायची. गाडी चालवत असताना, चालकाशी कोणीही बोलू नये. चालकाला त्रास होईल एवढय़ा आवाजात गोंगाट करू नये. आजकाल एसटीतील हे नियमही दिसेनासे झाले आहेत. बहुतेक एसटीबस चालक हे वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना दिसतात. त्यामुळेच वाहन चालवताना चालकाचे भान असणे फार महत्त्वाचे असते.

आजकाल अतिउत्साहाच्या भरात गाडी चालवण्याचे प्रमाण फारच वाढले आहे. माझा गाडीवर कन्ट्रोल आहे, हे दाखवण्यासाठी प्रसंगी अनेकजण नको इतके धाडस करतात. यातच अपघात घडतात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, त्याच्या कामात व्यत्यय येणार नाही आणि त्याची नजर गाडीवरून दुसरीकडे वळणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अंबेनळी घाटात ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, तिथे क्रॅश बॅरियर लावण्याचे काम निविदेत समाविष्ट हेते व ते प्रत्यक्षात केले गेले नाही. ही गंभीर बाब म्हटली पाहिजे.

हे अपघात रोखायचे असतील तर त्यासाठी वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सरकारी नियम करून असे नियंत्रण ठेवणे कितपत परिणामकारक होईल हे सांगता येत नाही. मात्र त्या त्या वाहनातून प्रवास करणाऱ्यांनी जरी आपल्या चालकावर नियंत्रण ठेवण्याचा आणि त्याची बेपर्वाई, तसेच त्याचा बेदरकारपणा यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला, तरी बरेचसे अपघात आपण टाळू शकतो. दुर्दैवाने चालकाला घाबरून किंवा लोकलाजेस्तव हेच काम बहुतेक जण करीत नाहीत. प्रवाशांमध्येही जागृती होणे तेवढेच आवश्यक आहे.

प्रत्येक वेळी चालकच जबाबदार असतात असे नाही. कारण त्यांनाही जीव गमवावा लागतो. त्याचबरोबर रस्त्यांची दुरवस्थाही तितकीच जबाबदार असते. बऱ्याचशा घाटातील कठडे अनेक ठिकाणी तुटलेले आहेत. एका बाजूला उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी, अशा वेळी थोडेसे दुर्लक्ष झाले तर मोठा अपघात होऊ शकतो. रस्त्यांची ही परिस्थिती का झाली, त्याला जबाबदार कोण? याचा शोध कधीही घेतला जात नाही. रस्त्यांवर या ना त्या कारणाने अडथळे करणारे, रस्ता नादुरुस्त होण्यास जबाबदार असलेले, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणारे, दुरुतीत किंवा रचनेत त्रुटी ठेवणारे मोकळेच राहतात. प्रवाशी मात्र जिवानिशी जातात.

खरेतर असे अपघात होऊच नयेत म्हणून विविध योजना करण्याची गरज असते. दुभाजकावर रेडियम लावणे, सूचना फलक, गतिरोधक असावेत, धोकादायक वळणे दुरुस्त करावीत. लेन कटिंग न करणे, साईड इंडिकेटरचा वापर करणे, रस्त्याची रुंदी वाढविणे या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अद्ययावत यंत्रणांचा उपयोग करून संपूर्ण रस्त्यांवर लक्ष ठेवायला हवे. शिस्तीला प्राधान्य दिले गेले पाहिजे.

महाराष्ट्रातील बऱ्याच घाटात संरक्षण कठडय़ाचे मोठे नुकसान होऊन अक्षरशः घाटातील संरक्षण कठडय़ांची चाळण झाली आहे. ढासळलेल्या कठडय़ांचा प्रश्न ऐरणीवर येऊन ते अपघातास निमंत्रण देत असल्याने या घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. तरीही झोपेचे सोंग घेतलेल्या बांधकाम विभागाकडून कसलीही उपाययोजना करण्यात आली नाही. याउलट ज्या ठिकाणी कठडे ढासळले आहेत त्या ठिकाणी बांधकाम विभागाकडून वाळूनी भरलेली पोती अथवा फुटके ड्रम पांढरा रंग देऊन उभे करण्यात आले आहेत हे विदारक चित्र सध्या बऱ्याच घाटात दुर्दैवाने पाहवयास मिळत आहे. तरीही बांधकाम विभागाला जाग येत नसेल तर किती जणांचे अपघातात जीव गेल्यावर कठडय़ांच्या बांधकामास सुरुवात होणार आहे असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात होत आहे.