Dahi Handi 2025 – मुंबईत दादरमधील हिंदू कॉलनीत गोविंदा रचणार थरावर थर; एकूण 21 लाख 11 हजार 111 रुपयांच बक्षीस

दहीहंडी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. गोविंदाही हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबईच्या विविध भागांमध्ये शनिवारी (16 ऑगस्ट 2025) गोपाळकाला साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे गोविदांची सलामी देण्यासाठी आणि आयोजकांच्या बक्षीसांची लयलूट करण्यासाठी लगबग पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर पारंपरिक हिंदू सण जपणाऱ्या दादर येथील हिंदू कॉलनी येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पसायदान या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने दादरमधील हिंदू कॉलीमध्ये भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण 21 लाख 11 हजार 111 रुपयांचं बक्षीस गोविंदांसाठी ठेवण्यात आलं आहे. तसेच जय जवान गोविंदा पथक सुद्धा या ठिकाणी येऊन सलामी देणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे. दादर पूर्वी येथील हिंदू कॉलनीमधील पहिल्या गल्लीत हा दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार आहे. दहीहंडी उत्सव सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. तसेच प्रथम येणाऱ्या 50 गोविंदांना या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. आयोजन दणक्यात करण्यासाठी पसायदान, मुंबईच्या अध्यक्षा रुपाली काणकोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील सदस्यांची जोरदार तयारी सुरू आहे.