दहिसर येथील पुलाजवळ बेवारस अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचा पंचनामा करताना 20 फूट उंचावरून नाल्यात पडून एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. मुकेश खरात असे त्या अधिकाऱ्याचे नाव असून या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहेत. त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोमवारी बोरिवली पश्चिम येथील दहिसरच्या दिशेने रेल्वे रुळाखाली वाहणाऱ्या नाल्यावर बांधलेल्या पुलाच्या भिंतीवर एक जण बेशुद्ध अवस्थेत पडला होता असे एमएचबी पोलिसांना समजले . त्या माहितीनंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक मुकेश खरात आणि पथक हे घटनास्थळी गेले. घटनास्थळी एक जण मृत अवस्थेत दिसला. त्यामुळे खरात आणि त्याचे पथक हे विविध अँगलने पंचनामा करत होते.
खरात हे रेल्वे रुळाजवळ उभे राहून पंचनामा करत होते. तेव्हा तेथून जाणाऱ्या लोकलने हॉर्न वाजवला. अचानक हॉर्न ऐकून खरात यांना धक्काच बसला. त्यामुळे ते 20 फूट नाल्यात पडले. अपघातात जखमी झालेल्या खरात यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे. ज्या व्यक्तीचा रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला होता, त्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे तपासात समोर आले आहे.