Video – दहिसर कांदरपाडा आयसीयू केंद्रात वैद्यकीय संयंत्राला लागलेली आग वेळीच विझवली

दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी कार्यरत असणाऱ्या अतिदक्षता उपचार केंद्रामध्ये, रुग्णाशेजारी वैद्यकीय संयंत्राला लागलेली आग त्याचक्षणी प्रसंगावधान राखून विझवण्याची कामगिरी तेथील परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांनी पार पाडली. या दक्षतेबद्दल सर्व मान्यवरांकडून कौतुक करण्यात येत आहे.

महानगरपालिकेकडून संचालित विविध कोरोना केंद्रांमध्ये वैद्यकीय सेवा-सुविधा दर्जेदारपणे पुरवण्यात येत आहेत. सोबत इतरही आवश्यक सुविधा तसेच सुरक्षेच्या उपाययोजना उपलब्ध असतील, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. या केंद्रांवर नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना अग्नीशमन व आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देखील नियुक्तीप्रसंगी देण्यात आले आहे. त्याचा उपयोग अशा घटनांप्रसंगी विचलीत न होता कसा करावा, याचे उदाहरणच आजच्या घटनेतून या कर्मचाऱ्यांनी समोर ठेवले आहे.

दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी 100 रुग्ण शय्या क्षमता असलेले सुसज्ज असे अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित असून त्याचे संचालन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. या केंद्रामध्ये एका रुग्णाशेजारी असलेल्या एचएफएनसी (हाय फ्लो नोझल कॅनूला) संयंत्राने आज ( 29 ऑक्टोबर 2020) दुपारी 2 वाजून 11 मिनिटांच्या सुमारास पेट घेतला. त्यावेळी रुग्णाजवळ असलेल्या परिचारिका श्रीमती अनुपमा तिवारी यांनी क्षणार्धात संयंत्र रुग्णशय्येपासून दूर केले. संयंत्राचा वीजपुरवठा खंडीत केला. आजूबाजूच्या इतर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी, वॉर्डबॉय जतीन यांच्यासह इतर कर्मचारी यांनी जवळच उपलब्ध असलेले अग्निरोधक उपकरण (fire extinguisher) आणले आणि पेटलेले वैद्यकीय संयंत्र क्षणार्धात विझवले. प्रसंगावधान राखून आग विझवल्याने पुढील दुर्घटना टळली.

सदर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांचे या कामगिरीबद्दल राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह विविध मान्यवरांनी कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या