मास्कशिवाय फिरणार्‍यांवर दहिसर, बोरिवली, कांदिवलीत तीन लाखांची कारवाई

432

कोरोना रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक केले असताना मुंबईच्या अनेक भागात रहिवासी मास्क न लावता बेजबाबदारपणे फिरत आहे. याची गंभीर दखल घेत पालिकेने सुरू केलेल्या कारवाईत दहिसर, बोरिवली आणि कांदिवलीत सुमारे तीन लाखांचा दंड वसूल केला आहे. शिवाय २६ जणांना तंबी देऊन सोडण्यात आले आहे.

दक्षिण मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असताना उत्तर मुंबईतील दहिसर ते मालाड विभागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या झोन – ७ मध्ये येणार्‍या आर उत्तर म्हणजेच दहिसर, आर मध्य – बोरिवली आणि आर दक्षिण – कांदिवलीत कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि प्रतिबंधित क्षेत्रात नियमांच्या कठोर अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये १० जुलैपर्यंत मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणार्‍या २८५ जणांना प्रत्येकी एक हजाराचा दंड करण्यात आला असल्याची माहिती झोन – ७ चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. आर दक्षिणमध्ये सध्या एकूण ३४१२ रुग्ण असून १९४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १३१४ एक्टिव्ह केस आहेत. आर मध्यमध्ये ३४३० एकूण रुग्ण असून १६२० जणांना डिस्चार्ज दिल्याने १६९७ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आर उत्तरमध्ये २०२० केसेस असून ११९१ जणांना डिस्चार्ज दिल्याने ६७१ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत.

कांदिवलीमध्ये सर्वाधिक दंड
झोन – ७ मधील कांदिवलीमध्ये सर्वाधिक १७९ जणांवर कारवाई करून सर्वाधिक १ लाख ७९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर बोरिवलीत २४ जणांवर आणि दहिसरमध्ये ८२ जणांवर कारवाई करून क्रमश: २४ हजार आणि ८२ हजारांचा दंड करण्यात आला आहे.

कंटेनमेंट झोन, सील इमारतींची संख्या घटली
झोन – ७ मध्ये ५ जुलै रोजी ८७ कंटेनमेंट झोन आणि १४८७ इमारती, इमारतीचे भाग सील करण्यात आले होते. मात्र ११ जुलै रोजी ७२ कंटेनमेंट झोन असून १५५१ इमारती, इमारतीचे भाग सील करण्यात आले आहेत. म्हणजेच सहा दिवसांत कंटेनमेंट झोनची संख्या १५ आणि सील इमारतींमध्ये ६४ ने घट झाली आहे. यावरून पालिकेच्या उपाययोजनांना आता यश येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या