दहिसर नदीने घेतला मोकळा श्वास! एलबीएस मार्गासह 301 बेकायदा बांधकामांवर बुलडोझर

809

बेकायदा बांधकामांविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून सुमारे दहा दिवसांत तब्बल 301 बांधकामांवर कारवाई केली आहे. यामध्ये दहिसर नदीकिनारी असणारी 256 बांधकामे परिमंडळ-7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार तर परिमंडळ-6 चे उपायुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्या 45 बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला.

दहिसर नदीकिनारी केलेल्या कारवाईत 256 पैकी 206 बांधकामे पालिकेच्या पथकाकडून हटवण्यात आली तर 50 बांधकामे रहिवाशांनी स्वतःहून हटवली. यामुळे नदीलगतच्या परिसराची पाणी साचण्यातून सुटका होणार असल्याची माहिती सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली. पूर्व उपनगरातही बेकायदा बांधकामांविरोधात जोरदार कारवाई सुरू असून लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्या बांधकामांवर सलग तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 45 बांधकामे हटविण्यात आली. भांडूप पूर्व परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे या परिसरातील वाहतूक अधिक वेगवान होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी व्यक्त केला.

दहिसर नदीकाठी तब्बल 2 हजार 65 फुटांची भिंत बांधण्याचे नियोजन असून यापैकी 1 हजार 45 फुटांची भिंत यापूर्वीच बांधण्यात आली आहे, तर उर्वरित 1 हजार 20 फुटांची भिंत बांधण्याचा मार्ग 235 बांधकामांवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर मोकळा झाला आहे.

गेल्याच आठवडय़ात सलग दोन वेळा घाटकोपर व कुर्ला परिसरात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मार्गालगतची 140 बांधकामे हटविण्यात आली होती. यानंतर आता तिसऱया कारवाईदरम्यान भांडूप पूर्व परिसरातील लालबहादूर शास्त्री मार्गालगत असणारी 45 बांधकामे तोडण्यात आली आहेत. यानुसार गेल्या आठवडाभरात लालबहादूर शास्त्राr मार्गालगतची तब्बल 185 बांधकामे तोडण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या