देशभरातील महत्वाच्या घडामोडी

गद्दार आमदारांची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असतानाच बुधवारी मिंधे गटाच्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गद्दार आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले आहे. शिवसेनेची याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी सूचिबद्ध झाली आहे.

मेट्रोचे तिकीट आता व्हॉट्सअ‍ॅपवर

एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएल मेट्रोचा प्रवास अधिकाधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून व्हॉट्सअ‍ॅवर तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘दहिसर पश्चिम-अंधेरी पश्चिम मेट्रो 2 अ’ आणि ‘दहिसर पूर्व – गुंदवली मेट्रो 7’ मार्गिकांवर प्रवाशांसाठी ही सुविधा असेल. गुंदवली मेट्रो स्थानकात नुकतीच ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

‘जी.टी.’, ‘कामा’मध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र

रक्तशुद्धीकरणाची गरज भासणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील जी. टी. रुग्णालय व कामा रुग्णालयामध्ये रक्तशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने घेतला आहे.

आरटीई प्रवेशाच्या 26 हजार जागा रिक्त

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत राज्यात यंदा आरटीई प्रवेशाच्या 26 हजारांहून अधिक जागा यावर्षी रिक्त राहिल्या आहेत. आरटीई प्रवेशांच्या नियमांत केलेल्या बदलामुळे उद्भवलेली न्यायालयीन प्रक्रिया याचा फटका प्रवेश प्रक्रियेस बसला आहे.

चक्र शिल्डने शोधला प्रदूषणावर उपाय

चक्र शिल्डने प्रदूषणावर उपाय शोधला असून रेट्रोफीट एमिशन कंट्रोल डिव्हाईस हे उपकरण तयार केले आहे. सीपीसीबी या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून या उपकरणाला मंजुरी मिळाली आहे. देशभरातील 61 ते 800 किलो वॅट डिझेल जनरेटरसाठी हे उपकरण तयार करण्यात आले आहे. चक्र शिल्डचे हे उपकरण हवेतील प्रदूषित घटक हेरून घेते आणि 80 ते 90 टक्क्यांनी प्रदूषण कमी करते. पुणे आणि गुरुग्राम येथे या उपकरणाची निर्मिती करण्यात आली असून सध्या वाढत चाललेल्या प्रदूषणावर हे उपकरण अत्यंत प्रभावी ठरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

दादरमध्ये आयुर्केदिक सेंटर सुरू

दादरमध्ये आर्य वैद्य फार्मसीने अद्ययावत नायर समाज आयुर्वैदिक सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये आता अपग्रेडेड पायाभूत सोयीसुविधा आणि अत्याधुनिक उपचार सुविधा माफक दरात उपलब्ध आहेत. तज्ञ कैद्यांकडून रुग्णांना सल्ला आणि उपचार दिले जाणार आहेत.

अन्नात थुंकी मिसळल्यास दहा वर्षे तुरुंगवास

उत्तर प्रदेशात अन्नामध्ये थुंकी किंवा युरीन मिसळल्यास दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. योगी सरकार याबाबत कायदा तयार करत आहे. हा कायदा लागू झाल्यास, अशा प्रकारचा कायदा लागू करणारे यूपी हे देशातील पहिले राज्य ठरेल. नवीन कायद्यात ग्राहकांना हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये काय पदार्थ दिले जात आहे, हे विचारण्याचाही अधिकार असेल. सरकार उत्तर प्रदेश प्रिव्हेंशन ऑफ स्यूडो-अनफ्रेंडली ऑक्टिव्हिटीज आणि थुंकणे प्रतिबंधित अध्यादेश 2024 आणि यूपी प्रिव्हेंशन ऑफ कंटामिनेशन इन फूड हा अध्यादेश आणणार आहे.

अयोध्येत विमानात बॉम्बची अफवा

जयपूरहून निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे उत्तर प्रदेशातील अयोध्या विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले. या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी विमानात 139 प्रवासी होते, त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच विमानात सर्च ऑपरेशन करण्यात आले. जयपूरहून उड्डाण केल्यानंतर विमानात बॉम्ब असल्याचा संदेश आला होता. सीआयएसएफच्या जवानांनी विमान अयोध्येत उतरल्यानंतर त्याचा ताबा घेतला.

हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के

हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात आज दुपारी 12 वाजून एक मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.3 इतकी मोजली गेली. जमिनीखाली त्याची खोली 5 किलोमीटर होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या मते मंडी, हिमाचल प्रदेश येथे दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर पडले, मात्र भूकंपाची तीव्रता कमी असल्याने बहुतांश लोकांना ते जाणवू शकले नाहीत.

विमानतळावरून 3 कोटींचा गांजा जप्त

सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 3.46 किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 3 कोटी 46 लाख रुपये इतकी आहे. याचा अधिक तपास सीमा शुल्क विभाग करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी, ड्रग, परदेशी चलन तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घेतली आहे. तरीदेखील गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर सोने, ड्रग तस्करीच्या घटना घडत आहेत.