जगभरातील महत्वाच्या घडामोडी

अतिशींविरोधात काँग्रेसच्या लांबा

काँग्रेस महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा कालकाजी मतदारसंघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज त्यांच्या नावाची घोषणा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 3 यादीत 48 उमेदवावांची नावे जाहीर केली आहेत. अलका यांनी 20 वर्षांच्या कारकिर्दीत तीन विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत.

आपत्ती भाजपावर आली – केजरीवाल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. आप हे दिल्लीतील आपत्तीचे सरकार असल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले. याला उत्तर देताना केजरीवाल म्हणाले दिल्लीत आपत्ती भाजपावर आली आहे. तीन प्रकारच्या आपत्ती आहेत. पहिली आपत्ती भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, दुसरे म्हणजे निवडणुका कोणत्या मुद्यावर लढायच्या आहेत, याचे नरेटिव्ह भाजपकडे नाही. तिसरे म्हणजे निवडणुका कोणत्या अजेंड्यावर लढवायच्या आहेत, याची माहिती नाही.

इस्रायलचा सीरियावर सर्जिकल स्ट्राईक

इस्रायलच्या हवाई दलाने 4 महिन्यांपूर्वी सीरियात सर्जिकल स्ट्राइक केला होता. या हल्ल्याचा व्हिडीयो इस्रायलने गुरुवारी रात्री उशिरा जारी केला. इस्रायली सैन्याने 120 एलीट कमांडोंच्या एका विशेष पथकाच्या माध्यमातून सीरियात 200 किलोमीटर आत घुसून कारवाई केली आणि इराणचा क्षेपणास्त्र कारखाना उद्ध्वस्त करून टाकला.

मणिपुरात उपायुक्त कार्यालयावर हल्ला

मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी माफी मागूनदेखील मणिपुरात हिंसाचाराची आग कायम आहे. कुकी बंडखोरांनी कांगपोकपी येथील उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस अधीक्षक (एसपी) जखमी झाल्याचे वृत्त आहे. आधी मोर्चा मग हल्ला अशी रणनीती बंडखोरांची होती. आज सायंकाळच्या सुमारास एका गटाने थेट उपायुक्त कार्यालयाला लक्ष्य करत काही प्रशासकीय वाहनांचीही तोडफोड केली.

अल्लू अर्जुनला जामीन

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीप्रकरणी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद येथील नामपल्ली कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. याआधी उच्च न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला होता. आता त्याला नियमित जामीन मिळाल्याने अभिनेत्याला मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाने त्याला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर दोन जामीन सादर करण्याचे निर्देश दिले.

विमानतळावरून 4 कोटी 84 लाखांचे सोने जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून 4 सोने तस्करांना दणका दिला. डीआरआयने कारवाई करून 4 कोटी 84 लाखांचे सोने जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये दोन विमानतळांवरील कर्मचारी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डय़ुटी फ्री कार्यरत असलेले काही कर्मचारी हे सोने तस्करीच्या सिंडिकेटमध्ये असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. त्या माहितीनंतर सोने विमानतळाबाहेर नेणाJdया दोन विमानतळ कर्मचारी आणि दोन रिसिव्हर्सना डीआरआयने ताब्यात घेऊन अटक केली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला अटक

अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घाटकोपर येथे घडली. या प्रकरणी एकाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार या गृहिणी असून त्या घाटकोपर येथे राहतात. त्याची चार वर्षाची मुलगी आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्याची मुलगी घरी होती. त्याने मुलीशी खेळण्याचा बहाणा करून तिच्यावर लैंगिक चाळे केले.

कर्जवसुलीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

कर्जवसुलीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मालाडच्या कुरार परिसरात घडली. सूरज जयस्वाल असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी कर्ज वसुली करणाऱ्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सूरज हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. त्याने वित्तीय संस्था आणि बँकेकडून कर्ज घेतली होती. त्या कर्जातून त्याने मालवाहू वाहने विकत घेतली होती. हप्ते थकल्याने रिकव्हरी एजंटने सूरजवर दबाव टाकला.