सुपरस्टार मोहनलाल रुग्णालयात
साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयाकडून जारी केलेल्या ऑफिशियल स्टेटमेंटमधून त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती देण्यात आली. त्यांना ताप आणि श्वास घेण्यात अडचण येत असल्याने त्यांना कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. यासोबतच त्यांना पाच दिवस सार्वजनिक कार्यक्रमांमघ्ये जाणे टाळण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले असून स्नायुदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ट्रम्प म्हणतात, कमला यांच्यापेक्षा मी सुंदर
कमला हॅरीस यांचे हसणे तुम्ही पाहिले असेल. त्या वेड्यासारख्या हसतात. उलट मी त्यांच्यापेक्षा खूप सुंदर आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॅरीस यांच्यावर वैयक्तिक टिपणी करत त्यांची खिल्ली उडवली. ‘टाइम’ मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या कमला हॅरीस यांच्या स्केचसंदर्भात ट्रम्प यांनी हे विधान केले. मासिकाने कमला हॅरीस यांची अनेक छायाचित्रे काढली, पण ती चालली नाहीत, त्यामुळे त्यांना स्केच बनवायला लागले. असे ते म्हणाले. दरम्यान कमला यांना हरवणे बायडेन यांच्यापेक्षा सोपे असल्याचेही ट्रम्प म्हणाले.
बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’चा दबदबा
श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्त्री 2’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने 172 कोटी रुपयांची तगडी कमाई करत आपल्यासह प्रेक्षकांचा पैसा वसूल केला आहे. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 64.80 कोटी, दुसऱ्या दिवशी 35.30 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 45.70 कोटी अशी मिळून 172 कोटी रुपयांची तगडी कमाई केली. सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांचा फायदा या चित्रपटाला झाला असून रविवारी हा चित्रपट 200 कोटींचा टप्पा पार करेल.
लाचेचे पैसे वाटून घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचा एक लाजिरवाणा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात वाहतूक पोलीस कर्मचारी एका झोपडीमध्ये वाहनचालकांना पकडून घेऊन येत आहे आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे दिसत आहे. इतकेच नाही तर तीन पोलीस त्या दिवसाची काळी कमाई आपापसात वाटून घेताना दिसत आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सांगितले की, तीन पोलीस कर्मचारी, दोन सहाय्यक उपनिरीक्षक आणि एक हेड कॉन्स्टेबल यांना निलंबित करण्यात आले.