तुर्कीच्या संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा
तुर्कस्थानच्या संसद सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील खासदार एकमेकांना भिडले. विरोधी खासदाराने तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगन यांच्या पक्षाला दहशतवादी संघटना म्हटल्याने हा राडा सुरू झाला. खासदारांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवले. रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी झाली. व्हिडीओ फुटेजमध्ये स्पीकरच्या व्यासपीठावरच्या पायऱयांवरही रक्त सांडल्याचे दिसत आहे. मुख्य विरोधी पक्ष सीएचपीचे प्रमुख ओझगुर ओझेल यांनी हिंसाचाराचा निषेध केला.
अफगाणिस्तानात 14 लाख मुलींच्या शिक्षणावर बंदी
अफगाणिस्तानमधील 14 लाख मुलींना शिक्षण घेण्यास तालिबानने बंदी घातली आहे. 2021 मध्ये सत्ता मिळवल्यानंतर तालिबानने मुलींना सहावीनंतरचे शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रातील एका एजन्सीने दिली. सहावी नंतर शिकणे हे शरिया किंवा इस्लामी कायद्याच्या विरोधात आहे, असे तालिबानने म्हटले. तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर जाणीवपूर्वक 14 लाख मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले असून ही टक्केवारी 80 टक्क्यापर्यंत आहे, असेही युनेस्कोने म्हटले.
अमेरिकेत हिंदुस्थानी व्यक्तीची गोळ्या घालून हत्या
अमेरिकेत राहणाऱ्या हिंदुस्थानी व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मैनांक पटेल (वय 36) असे या व्यक्तीचे नाव असून तो पत्नी आणि पाच वर्षीय मुलीसोबत राहत होता. तो मूळचा गुजरातमधील वडोदराचा रहिवासी होता. पॅरोलिनामध्ये स्टोरमध्ये दरोडा टाकणाऱ्या चोरांनी मेनांकवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्याप्रकरणी अमेरिकन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. मैनांकला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.
कॅनडात हिंदुस्थान-खलिस्तान समर्थकांमध्ये हाणामारी
कॅनडातील सरे येथे स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हिंदुस्थानी आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये हाणामारी झाली. यामुळे या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण झाले. या ठिकाणी हिंदुस्थानी लोक तिरंगा घेऊन हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देत स्वातंत्र्यदिन साजरा करत होते. यावेळी खलिस्तानी समर्थकही पोहोचले. हिंदुस्थानी आणि खलिस्तानी यांच्यात शाब्दिक चकमकीनंतर हाणामारी झाली. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून कॅनडाच्या पोलिसांना मदतीला यावे लागले.
पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोनद्वारे ड्रग्जची तस्करी
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा ड्रग्ज आणि शस्त्रे यांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. पंजाबच्या कसूर पोलिसांनी हेरॉईनची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ड्रोनद्वारे 2 किलो हेरॉईन पाकिस्तानच्या सीमेवरून हिंदुस्थानात आणले जात होते. पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली. त्यांच्याकडून एक ड्रोन आणि दोन किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच ड्रोनद्वारे 15 कोटी रुपयांच्या हेरॅईनच्या तस्करीचे प्रकरण समोर आले होते.
केरळमध्ये पहिले डिजिटल कोर्टरूम
चेक बाऊन्सप्रकरणी सुनावणी घेण्यासाठी देशातील पहिले डिजिटल कोर्ट सुरू करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन केरळच्या कोल्लम येथे करण्यात आले आहे. याचे नाव 24 तास ऑनकोर्ट ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी या डिजिटल कोर्टाची सुरुवात केली आहे. ऑनकोर्टमधील सुनावणी पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. यात फायलिंग करण्यापासून केस दाखल करणे, स्वीकार करणे, कोर्टात हजेरी, सुनावणी आणि निकाल या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. जर या ऑनकोर्टला चांगला प्रतिसाद मिळत असेल तर संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केरळच्या न्यायपालिकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई यांनी म्हटले.