पाणीसाठा अवघ्या 28 टक्क्यांवर; राज्यातल्या धरणांनी तळ गाठला, कोयना धरणात फक्त 19 टक्के, मुंबईचा पाणीसाठा 16 टक्क्यांवर

मान्सूनच्या आगमनाचे सर्वांना वेध लागले असले तरी सध्याच्या घडीला राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा अवघ्या 28.10 टक्क्यांवर आला आहे. वीज निर्मितीचे प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा तर फक्त 19.36 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर वीज निर्मितीचे संकट निर्माण होऊ शकते.

राज्याच्या विविध भागात लहान-मध्यम आणि मोठी मिळून सुमारे 2 हजार 997 धरणे आहेत. या सर्व धरणांत शनिवारी 28.10 टक्के पाणीसाठा होता. मागच्या वर्षी याच दिवशी सर्व धरणांमध्ये मिळून 24.79 टक्के पाणीसाठा होता.

राज्याला मान्सूनचे वेध लागले आहेत, पण तरीही राज्य सरकारच्या वतीने पाणीसाठय़ाचा आढावा घेतला तेव्हा सध्या चिंतेचे वातावरण असल्याची परिस्थिती आहे. मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे, पण तरीही मोसमी वाऱ्यांमध्ये काही बदल झाला तर मान्सून लांबण्याचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने मुंबईसह राज्यातील पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात आला.

वीज निर्मितीची चिंता

कोयना धरणाच्या पाण्यावर वीज निर्मिती होते. त्यामुळे या धरणातील पाणीसाठय़ावर जलखात्याचे लक्ष असते. मागील पावसाळय़ात कोयना धरण 100 टक्के क्षमतेने भरले होते. पण उन्हाळय़ाची तीव्रत वाढल्याने धरणातील पाणीसाठा खालावत गेला आणि सध्याच्या धडीला या धरणातील पाणीसाठा फक्त 19.36 टक्क्यांवर आला आहे.

पुण्यातील पाणीसाठा सर्वात कमी

नागपूरमधील धरणात 33.53 टक्के पाणीसाठा आहे. अमरावती 39.85 टक्के, संभाजीनगर 27.67 टक्के, नाशिक 29.97 टक्के, कोकण 28.10 टक्के आणि सर्वात कमी म्हणजे फक्त 20.88 टक्के पाणीसाठा पुण्यातील धरणांमध्ये आहे.

मुंबईतील परिस्थिती चिंताजनक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 16 टक्क्यांवर आला आहे. मध्य वैतरणा 15.33 टक्के, भातसा 34.64 टक्के, मोडक सागर 51.17 टक्के, तानसा 28.03 टक्के, वैतरणा 39.43 टक्के.