नृत्यसाधना!

>> वरद चव्हाण

नृत्यदिग्दर्शिका दीपाली विचारे घरात पोलिसांची पार्श्वभूमी. पण नृत्याची आवड स्वस्थ बसू देईना. सासरची मंडळीही ग्लॅमरच्या जगापासून लांब. पण नृत्याची ओढ आणि ज्ञान आज दोन गोष्टींच्या जोरावर दिपाली नृत्यदिग्दर्शिका बनली.

नमस्कार, माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो! जिचे साधारण 2000 साली आलेले ‘ढगाला लागली कळ’ हे रिमिक्स गाणे फक्त महाराष्ट्रानेच नव्हे, तर संपूर्ण देशाने डोक्यावर घेतले होते. त्यावेळचे चार्टबस्टर गाणे म्हणून या गाण्याची ओळख होती. या गाण्याच्या नृत्याचेसुद्धा कौतुक झालं होतं. ‘माझ्या मित्राची बायको’ या सदरात आज आपण वाचणार आहोत त्याच सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफबद्दल. दीपालीचं बालपण मुंबई, परळसारख्या शहरात गेलं. सातवीत असताना क्लासिकल डान्स शिकायला सुरुवात केली. हळूहळू नृत्याची आवड वाढू लागली. स्वर्गीय आशा जोगळेकर या दीपालीच्या गुरू आहेत. स्वतःला मिळालेले नृत्याचे धडे हे स्वतःपुरते न ठेवता आपण इतरांनाही शिकवले पाहिजेत म्हणून दीपालीने परळलाच डान्स क्लास करायचे ठरविले. दीपालीच्या निर्णयाचे तिच्या आई-बाबांनी स्वागतच केले. पोरीला नृत्य व अभिनयाची आवड आहे हे तिच्या बाबांच्या लक्षात येत होते. त्यांचा दीपालीला पूर्ण पाठिंबादेखील होता, परंतु हातात एखादी डिग्री असायलाच हवी अशी त्यांची अट होती.

दीपाली नृत्य व अभिनयाप्रमाणेच अभ्यासातसुद्धा हुशार होती. दीपालीचे बाबा स्वतः पोलीस असल्यामुळे तिला युनिफॉर्मची प्रचंड क्रेझ होती. आपणसुद्धा असे करीअर निवडावे, ज्यात एक विशिष्ट प्रकारचा युनिफॉर्म असेल असे तिला वाटत होतं. म्हणून तिने बीए इन इकॉनॉमिक्स करून नंतर लॉ शिकून वकिली करायचे ठरवले. अभ्यास चालू असतानाच दीपाली रूपारेल कॉलेजमध्ये तिच्या नृत्यामुळे प्रसिद्ध होऊ लागली. तिने सादर केलेला ‘जोगवा’ व सुपरस्टार भरत जाधव यांचा सोलो ऍक्ट कॉलेजमध्ये खूप प्रसिद्ध होता. दीपाली व भरत जाधव एकत्र मिळून विविध ठिकाणी स्वतःचे कार्यक्रम सादर करीत होते, अशाच वेळी तिच्या आयुष्यात रमेश गुरव आले. त्यांच्यामुळेच दीपालीला कोरिओग्राफी म्हणजे नक्की काय हे हळूहळू समजू लागले. एक-दोनदा त्यांना ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार कसा एखाद्या गाण्यात नाच कसा बसवतात हे बघायची व बरंच काही शिकण्याची संधी मिळाली. काही काळानंतर दीपालीला प्रभात चॅनलवरील ‘शाहीर’ या मालिकेसाठी नृत्यदिग्दर्शन करायची संधी दिली, पण एखादे नृत्य रंगमंचावर बसवणं वेगळं व कॅमेऱयासमोर बसवणं वेगळं हे हळूहळू दीपालीच्या लक्षात येत होतं. त्यामुळे कॅमेऱयासमोरचा डान्स बसवणं हे दीपालीला सुरुवातीला जरी कठीण गेले असले तरी सतत शिकत करायची सवय असल्यामुळे दीपाली तांत्रिक गोष्टी शिकत गेली व कॅमेऱयासमोर नृत्य कसे सादर करायचे हे तिच्या लक्षात येऊ लागले केलं.

जसे दीपालीच्या आयुष्यात अनेक गोष्टी नियती घडवत गेली तसेच तिचे लग्नही ठरलं. दीपाली नृत्याचे कार्यक्रम करीत होती तेव्हाच महेश विचारे यांनी दीपालीला पाहिलं. दीपाली व महेश यांचा एक कॉमन मित्र होता. याच मित्राच्या मदतीने महेश यांनी दीपालीशी ओळख वाढवली. महेशजींचा फिल्म किंवा नृत्याशी काहीही संबंध नाही. ते मुळात क्रिकेटपटू आहेत, शिवाय बँकेत कामालासुद्धा आहेत. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी एकमेकांच्या घरी सांगायचे ठरवले. दीपाली घरात सगळय़ांचीच लाडकी व धाकटी असल्यामुळे महेशजींना अनेक प्रश्नोत्तरांना सामोरे जावे लागले, पण सगळय़ा प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देऊन महेशजींनी सगळय़ांची मने जिंकली. सासरचा दीपालीच्या करीअरसाठी इतका पाठिंबा होता की, आपण आता सासरी आहोत याची जाणीवच दीपालीला झाली नाही. प्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार हा दीपालीचा चुलत भाऊ. या भावामुळेच दीपालीला तिच्या आयुष्यातला पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी दीपाली सात महिने गरोदर होती. त्यानंतर संजय लीला भन्साळी ‘देवकी’ नावाचा मराठी चित्रपट करीत होते. भन्सालीने त्यांच्या स्टाफला ‘ढगाला लागली कळ’ या गाण्याच्या कोरिओग्राफरला शोधण्याची मोहीम दिली होती. स्टाफने त्याचे काम केले व दीपालीच्या पदरात ‘देवकी’ हा चित्रपट आला. कौतुकाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात नृत्यदिग्दर्शनासाठी दीपालीला स्टेट ऍवॉर्डसुद्धा मिळालं. आज दीपाली एक इस्टॅब्लिश कोरिओग्राफर जरी असली तरी ती अत्यंत डाऊन टू अर्थ आहे. दीपाली व महेशजींना तनया नावाची कन्या आहे. तनयाला मॉडेलिंग व वीएफएक्स शिकायची प्रचंड आवड आहे. या लेखावरून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजेच जरी आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी नियतीमुळे घडत गेल्या तरीही प्रचंड मेहनत आणि मिळालेली प्रसिद्धी व मान जपणे हे आपल्याच हातात असते आणि दीपालीला या सगळय़ाची पूर्ण जाणीव आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या