भोस्ते घाटमार्गावरील खड्डे धोकादायक, पावसाळ्यात अपघातांची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । खेड

मुंबई – गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात पडलेल्या खड्डा महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या ठेकेदारांकडून बुजवण्यात आला नसल्याने या ठिकाणी अपघातांचा धोका वाढला आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वीच घाट रस्त्यावर खड्डे पडू लागल्याने पावसाळ्यात या रस्त्याचे काय होईल या कल्पनेनेच वाहचालकांच्या पोटात भितीचा गोळा येऊ लागला आहे.

मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. भोस्ते घाट ज्या ठिकाणी सुरु होतो त्याच ठिकाणी एक मोठा खड्डा पडला आहे. सुरवातीला या ठिकाणी अगदी छोटा खड्डा होता मात्र या खड्डय़ात वारंवार वाहने आदळून गेल्या काही दिवसात हा खड्डा मोठा झाला आहे. या खड्डय़ात दुचाकी आणि रिक्षा यासारखी छोटी वाहने आदळून लहानमोठे अपघातही झालेले आहेत. मात्र पडलेला खड्डा बुजविण्याकडे संबधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने दिवसेंदिवस खड्ड्यांचा परिघ वाढतचा चालला आहे. अचानक समोर आलेला खड्डा वाचविण्यासाठी वाहन चालक वाहनाला ब्रेक लावत आहेत. त्यामुळे समोरुन येणारे किंवा मागून येणारे वाहन खड्डा वाचविणाऱ्या वाहनावर आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावर पडलेलेले खड्डे बुजविण्याबाबत ठेकेदाराला काय सुचना करण्यात आल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी महामार्ग महाड विभागाचे अभियंता गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत ठेकेदाराला सुचना करण्याचे आश्वासन दिले आहे.

भरावाची माती रस्त्यावर येणार
चौदपरीकरणाच्या कामासाठी भोस्ते घाट पुर्णपणे कापण्यात आला आहे. गोव्याकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजुला मातीचे ढिगारे आणि दगड रचून ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी मातीचा भरावही करण्यात आला आहे. पावसाळा सुरु झाला की भरावाची माती पाण्यामुळे रस्त्यावर येणार आहे. त्यामुळे रस्ता निसरडा होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच घाटातील रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले असल्याने अपघातांना धोका आणखीनच वाढणार आहे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे मात्र कोणतीच उपाययोजना अद्याप तरी केली गेलेली नाही.