पुणे – खड्ड्यात पडलेल्या मुलाला वाचवायला गेलेले जवान ढिगाऱ्याखाली अडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यातील दापोडी येथे गटारीसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेले अग्निशामक दलाचे दोन जवान आणि दोन नागरीक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. या पाचही जणांना वाचवण्यासाठी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून एका जवानाला बाहेर काढण्यात यश आले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोडी येथील विनियार्ड चर्चच्या पाठीमागील बाजूस गटारीच्या लाईनसाठी एक मोठा खड्डा खोदण्यात आलेला आहे. जवळपास वीस फूट खोल या खड्ड्यात एक मुलगा पडल्याची माहिती रविवारी सायंकाळी अग्निशामक दलास मिळाली. प्राप्त माहितीनुपसार अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

खड्ड्यात पडलेल्या मुलाला वर काढत असताना अचानक मातीचा ढिगारा खाली कोसळला. यामध्ये खड्ड्यात पडलेल्या मुलासह अग्निशामक दलाचे दोन जवान आणि दोन नागरीक गाडले गेले. या जवानांच्या बचावासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच एनडीआरएफचे एक पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. बचावकार्य सुरू असून सरोज फुंदे या जवानाला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

pune