
औंध येथून आंजर्ले समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या गुपमधील सहा जण खोल समुद्रात बुडल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. तर स्थानिक प्रशासनाने वेळीच धाव घेतल्याने तीन पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.
पुणे जिल्ह्यातील औंध येथील एका कंपनीत काम करणारे 14 कर्मचारी आंजर्ले गावी पर्यटनासाठी आले होते. भटकंतीसाठी आलेल्या 14 पर्यटकांपैकी 13 पर्यटक समुद्रात पोहण्यासाठी गेले. मात्र समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी सहा जण खोल समुद्रात बुडाले. याबाबत ग्रामस्थांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली.
पर्यटकांपैकी रोहित पलांडे (25), उबेल खान (24) आणि निहाल चव्हाण (23) या तिघांना वाचविण्यास ग्रामस्थांना यश आले तर यातील अक्षय राखेलकर (35) विकास श्रीवास्तव (25) आणि मनोज गावंडे (24) हे तिघे पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडाले. आंजर्ले येथील काही ग्रामस्थांच्या प्रयत्नाने वाचलेल्या तिघांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.



























































