दापोलीत परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून या परतीच्या पावसाने भात तसेच नागलीचे उभे पिक आडवे केल्याने पिकाची नासाडी झाली आहे. मेहनत करून हातातोंडाशी आलेले पीक शेतक-यांच्या तोंडून परतीचा पाऊस हिरावून नेत असल्याने शेतकरी मात्र चांगलाच हवालदिल झाला आहे.
दापोली तालुक्यात भात पिकाखालील एकुण 3667 हेक्टर क्षेत्र आहे. तर नागली पिकाचे 722 हेक्टर क्षेत्र आहे. दापोली तालुक्यात गेल्या आठवडाभर सातत्याने सायंकाळी पाऊस कोसळत असून या कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने पसवलेली तयार होत आलेली उभ्या पिकाची भातशेती ही पार आडवी केली आहे. त्यामुळे भाताच्या लोंबी या भातशेती मधील खाचरातील पाण्यात पार भिजत आहेत. भाताचे रोप आडवे झाल्याने त्याचा जोम कमी झाला असून पसवलेल्या भाताला आता आडव्या झालेल्या कमकुवत रोपामुळे आधार मिळेनासा झाला आहे. एकिकडे रानडुक्करे, वानर, केलटी, सालिंजर आदी जंगली प्राण्यांसह पशू पक्षांच्या नुकसानीचा त्रास तर दुसरीकडे परतीच्या पावसाने होणारे नुकसान या दुहेरी संकटात सापडलेला दापोली तालुक्यातील शेतकरी पुरता पिचला आहे.
उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने दापोली तालुक्यातील अनेकांनी शेती करणे सोडून दिली आणि पुणे मुंबई सारख्या शहरात रोजगारासाठी स्थलांतर केले आहे. त्यात काही शेतकरी तग धरून टीकुन असले तरी कधी पशु पक्षी, कधी अवेळी पडणारा पाऊस तर कधी लांबलेला पाऊस यात आणखीन भर म्हणजे पारंपरिक शेती पेक्षा यांत्रिक शेती करण्यासाठी येणारा खर्च आणि मनुष्य बळाची कमतरता त्यामुळे वाढलेले मजुरीचे दर पाहता शेती करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यापेक्षा मजुरी वा नोकरीला अधिक पसंती दिली जाते. येथील शेती तशी हेक्टर वा एकरातील नाही. गुंठ्यातील शेती त्यात डोंगर उतारावरील शेती आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीचे पिक बऱ्यापैकी आलेले असताना हाच घास शेतकऱ्यांच्या घशातून हिरावण्याचे काम परतीच्या पावसाने केले आहे. शासन स्तरावरून कोणत्याही प्रकारचे आदेश नसताही शेतकऱ्यांच्या भात तसेच नागली पिकाच्या नुकसानीचे कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले आहेत. मंगळवार पासुनच विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू झाल्याने या महत्त्वाच्या समस्येचा धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही कारण आचार संहितेचा भंग होईल मात्र आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या या रास्त समस्येवर उपाय योजना ही महत्त्वाची बाब आहे.
दापोली तालुक्यातील कृषी विभागाने आतापर्यंत भात 2.30 हेक्टर क्षेत्राचे तसेच 30 गुंठे नागली क्षेत्राच्या नुकसानीचे रितसर पंचनामे केले असले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खऱ्या ठोस मदतीची गरज आहे. पाडले येथे 120 गुंठे क्षेत्रात रत्नागिरी 8 या भात पिकाच्या वाणाची लागवड केली आहे. जंगली प्राण्यांचा त्रास तर आहेच. मात्र आता परतीचा पाऊस भातशेतीचे करत असलेले आर्थिक नुकसान कधीही न भरून येण्यासारखे आहे. त्यामुळे शासनाने या लोकांना आर्थिक मदतीचे अनुदान देऊन ठोस मदत करावी अशी स्पष्ट भुमिका पाडले येथील प्रगतशील शेतकरी महेश ऊर्फ बाळा बोरकर यांनी केली आहे.