‘दर्याभवानी’ – छत्रपती शिवरायांची अज्ञात शौर्यगाथा

>> क्षितिज झारापकर

दर्याभवानीछत्रपती शिवरायांच्या एका अज्ञात जलदुर्ग मोहिमेची चित्तथरारक गोष्ट

शिवछत्रपतींच्या चरित्रातील छोटय़ातल्या छोटय़ा घटनेवरून बलाढय़ कलाविष्कार सातत्याने होत असतात. महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासात अशा निर्मितींना लागणारी जबरदस्त कथानके पानापानावर सापडतात. मराठी माणूससुद्धा इतिहासातील काटेकोर तपशिलात शिरण्यापेक्षा त्यावर रचलेल्या नाटय़मय कादंबऱयांमध्ये अधिक रमतो हा इतिहास आहे. आपण आपला इतिहास हा ना. स. इनामदार आणि रणजीत देसाईंसारख्या सिद्धहस्त लेखकांच्या कादंबऱयांवर किंवा शाहीर परशुरामभाऊपासून बाबासाहेब पुरंदरेंच्या कथा कथनांवर किंवा आधारित करून जोपासतो. म्हणून ऐतिहासिक कलाकृत्या मराठी कलाविश्वात नेहमी यशस्वी होताना दिसलेल्या आहेत. उरलेल्या वर्षभरात ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘हिरकणी’ हे दोन शिवकालीन चित्रपट येऊ घातलेत. रंगभूमीचं म्हणाल तर ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ पासून ते ‘बेबंदशाही’पर्यंत मराठी इतिहास अत्यंत नाटय़मय पद्धतीने रंगमंचावरून सादर केला गेलाय. आता ललिता संतोष पोवळे या निर्मात्या उर्वीजा थिएटर निर्मित ‘दर्याभवानी’ हे नाटक शिवाजी महाराजांच्या चरित्रातली एक अत्यंत वेगळी गोष्ट घेऊन मराठी रंगभूमीवर आल्या आहेत.

‘दर्याभवानी’ हे नाटक वेगळं आहे. अनेक बाबतीत वेगळं आहे. ही शिवाजी महाराजांच्या आरमाराची कहाणी आहे, पण यात शिवाजी महाराज ऐकू येतात दिसत मात्र नाहीत हे महत्त्वाचं आहे. कारण कथा खांदेरी किल्ल्याच्या निर्माणाची आहे. घडणाऱया कथेत महाराज जसे संभवतात तसेच इथे आहेत त्यामुळे कथेचा फोकस हलत नाही. ‘दर्याभवानी’ हे तब्बल चाळीसहून अधिक कलाकार एकाचवेळी रंगमंचावर सादर करतात. यातच शिवाजी महाराजांच्या विचारांची महानता दिसून येते. हे नाटक असलं तरी पाहताना सतत एक सोहळा घडत असल्याचा प्रत्यय येत राहतो. अडीच तासांच्या या नाटय़ात ‘दर्याभवानी’ आपल्याला तत्कालीन शैली, संगीत, नृत्य आणि संस्कृतीचे सविस्तर चित्रण सादर करून भांबावून टाकतं. आग्री, कोळी आणि मराठी संस्कृतीचं विस्तृत सादरीकरण ‘दर्याभवानी’मध्ये पहायला मिळतं. या नाटकाचा एकंदर स्कोप लक्षात घेता हा मराठी रंगभूमीवरचा पहिला ब्रॉडवे सदृश प्रयत्न म्हणता येईल. बाबासाहेब पुरंदरे यांचं ‘जाणता राजा’ नाटय़गृहात सादर होऊ शकत नाही. ‘दर्याभवानी’ मात्र आचार्य अत्रे, गडकरींसारख्या नाटय़गृहांसाठी बेतलेलं आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे. भव्य नाटक करण्यासाठी मखरासमान गडगंज सेट उभा करण्याचा मोह ‘दर्याभवानी’ कटाक्षाने टाळला गेलाय हे विशेष आहे. नाकापेक्षा मोती जड न होऊ देता ‘दर्याभवानी’ने आपली भव्यता कायम राखली आहे हे दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकरांचं कसब आहे.

‘दर्याभवानी’ या नाटकात सर्वात महत्त्वाचे आहेत ते लेखक संदीप विचारे आणि दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर. संदीप विचारे यांची आधीची ओळख म्हणजे ते एक प्रख्यात नाटय़निर्माते आहेत. ‘दर्याभवानी’ हे त्यांनी लिहिलेलं नाटक आहे. नाटकाची गीतेही त्यांनीचं लिहिलेली आहेत. ‘दर्याभवानी’ आपली कथा न सोडता तत्कालीन समाज जीवनावरही भाष्य करतं आणि आपल्याला त्यावेळच्या संस्कृतीची नृत्यगायनातून ओळखही करून देतं. हे श्रेय सर्वोतोपरी संदीप विचारे यांचं आहे. शिवाय तेदेखिल या नाटकाचे निर्माते आहेत. डॉ. अनिल बांदिवडेकर हे नाव प्रायोगिक नाटक माध्यमात अत्यंत प्रचलित आणि मानाचं नाव आहे. बांदिवडेकरांनी ‘दर्याभवानी’चं दिग्दर्शन इतकं सुरेखपणे व्यावसायिक केलंय की आश्चर्य वाटतं. चाळीस कलाकारांना योजायचं हेच मुळात मराठी रंगमंचाच्या आवाक्याबाहेरचं आव्हान आहे. इथे अनिलजींनी ते केवळ पेललेलं नाही तर त्यातून अनेक नेत्रसुखद कॉम्पोझिशन्स साध्य केली आहेत. अर्थात त्यात त्यांना खूपच मोलाची साथ ही सचिन गजमल या तरुण नृत्यदिग्दर्शकाची आहे. गजमल ‘दर्याभवानी’मध्ये नृत्य कंपूत सहभागीही होतात. मनोहर गोलांबरे यांच्या चाली आणि निषाग गोलांबरे यांचं पार्श्वसंगीत ‘दर्याभवानी’ला अधिक उंची प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. शिवकालीन काळ उभा करताना पोशाख महत्त्वाचे असतात. इथे मोहिनी टिल्लू, कलिका विचारे आणि गणेश मांडवे ही मंडळी नाटकाची वेशभूषा समर्थपणे साभांळतात. चाळीस कलाकरांना सजवणं सोपं नाही आणि त्यात पंचवीसहून अधिक नर्तक ज्यांना प्रत्येक गीतासाठी वेगळी वेशभूषा ही अजब कर्तब या मंडळींनी लीलया पेलली आहे. कुठेही दृश्य स्वरूपात किंवा नाटकाच्या भव्यतेत विसंगती आढळत नाही. रंगभूषेतही हेच दिसून येतं. उदयराज तांगडी यांची रंगभूषा विविधेतून नटणारी आहे. ‘दर्याभवानी’मध्ये तांडेल आहेत, कोळी आहेत, मावळे आहेत, पंत मंत्री आहेत, मराठे आहेत, मुघल आहेत, इंग्रज आहेत, डच आणि फ्रेंचदेखील आहेत. या सगळ्या पात्रांमध्ये तंतोतंत रंग तांगडी यांनी भरले आहेत. ‘दर्याभवानी’ हे खरोखर टीम वर्कचं नाटक आहे, पण इथे गोची आहे. ‘दर्याभवानी’ हे कलाकारांच्या बाबतीतही टीम वर्कचं नाटक आहे. त्यामुळे इथे चाळीस कलाकारांच्या कामगिरीचा एकसंध लेखाजोखा घ्यावा लागणार. प्रमुख पात्र आहेत, पण कलाकार म्हणून कुणीही कमी पडत नाही. त्यामुळे कुणाही कलाकाराचा उल्लेख इथे करणं बाकीच्या टीमवर अन्यायकारक होईल. कलाकारांची माफी मागत मी ‘दर्याभवानी’च्या सर्वच्या सर्व कलाकारांचं मनापासून कौतुक करतो की, त्यांच्या मेहनतीतून एक भव्यनिर्मिती जन्माला आलेली आहे. एक चिकित्सक लेखक, एक संवेदनशील दिग्दर्शक, निर्भिड निर्माते आणि सृजनशील मेहनती टीम एकत्र आली की किती नेत्रसुखद आणि देदीप्यमान कलाकृती तयार होऊ शकते याचं सुंदर उदाहरण म्हणजे ‘दर्याभवानी’.

नाटक      दर्याभवानी

निर्मिती    उर्वीजा थिएटर

निर्माती    ललिता पोवळे

लेखन, गीते   संदीप विचारे

प्रकाश      शीतल तळपदे

नेपथ्य      प्राद वालावलकर

संगीत      मनोहर गोलांबरे

नृत्य        सचिन गजमल

रंगभूषा     उदयराज तांगडी

दिग्दर्शक   डॉ. अनिल बांदिवडेकर

कलाकार   40 यशस्वी कलाकारांचा संच

दर्जा       

आपली प्रतिक्रिया द्या