सामंजस्य सासू-सुनेतील

296

 सासूसुनेचं नातंपरंपरागत चालत आलेलंआज या नात्याची परिमाणं नक्कीच बदलत चालली आहेत. कारण छोट्या कुटुंबामुळे दोघींनाही एकमेकींच्या साथीनेच पुढे जायचं आहे. प्रत्येक कुटुंबाचे स्वतःच्या अशा देवधर्माच्या कल्पना असतातकुळाचार असतातआजच्या काळातील सासूबाईंच्या आपल्या सुनेकडून काय अपेक्षा आहेत अगदी तंतोतंत तसंच पुढे न्यावंकी कालानुरूप सूनबाईंनी आपल्या सोयीने हे कुळाचार पार पाडावेतपाहूया मतमतांतरे…  

काळानुसार वागायला हवं 

मी गृहिणी आहे. त्यामुळे मला घरी राहून कुळाचाराचे सोपस्कार पार पाडायला काही अडचण येत नाही. घर सांभाळून धार्मिक परंपरा जपू शकते. पण माझं असं मत आहे की, या सर्व कृती पूर्वापार चालत आलेल्या आहेत. माझ्या आईने-सासूने केलेल्या आहेत. त्याच्या आधी तिच्याही आईने केलेल्या आहेत. त्यांच्याकडूनच त्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. कुळाचार पालनात श्रद्धा किंवा विश्वास असतो त्यामुळेच त्या वंशपरंपरागत पार पाडल्या जातात. यातून जर कुटुंबात सकारात्मकता निर्माण होत असेल तर असे धार्मिक विधी करायला काहीच हरकत नाही. पण ज्या स्त्रिया ऑफिसला जातात त्यांना घर सांभाळून, ऑफिस, मुलांची जबाबदारी सांभाळून परंपरा जपणं जमत नाही. दोन्ही गोष्टींचा मेळ साधणं त्यांना कठीण जातं. काहीजणींना करीयरिस्टिक महिलांना याची आवड जरी असली तरी त्यांना वेळ मिळत नाही. कारण वेळेनुसार, काळानुसार आपल्यालाही चाललं पाहिजे. हे सगळं करूनच आपल्याला सर्वकाही मिळतं असं काही नाही. हा विश्वासही हवा. देवळात जाऊन देवीला श्रद्धेने नमस्कार केला किंवा तिचा नामजप केला तरीही फळ मिळू शकतं. माझी ही मतं सासूबाईंनाही पटत असल्यामुळे घरातील सामंजस्य, स्वास्थ्य आणि शांतता टिकून राहते.

रूपाली अमित शेलार

 स्वातंत्र्य लढून मिळवलं

लग्न झाल्यानंतर घरात होणारे कुळाचार लादले जाण्यापेक्षा ते आपण करायचे आहेत याचं एक दडपण असतंच. पण डोळसपणे ते करावेत असं मला वाटतं. माझ्या सासरी मला बरंच स्वातंत्र्य आहे. कुळाचार पाळण्याच्या विरुद्ध मी नाही. कारण यामुळे पावित्र्य जपलं जातं. सकारात्मकता घरात निर्माण होते. जे मला पटत नाही ते मी करणार नाही, असं स्वातंत्र्य माझ्या सासरी मी लढून मिळवलंय. आम्हा सुनांना जर योग्य भाषेत सणावाराचं महत्त्व समजवलं तर त्याचा वारसा पुढे जाईल. देवाजवळ दिवा लावणे आणि नमस्कार करणे एवढंच मी करते. माझ्या सासूबाई अडाणी असल्या तरी बर्‍याच आधुनिक होत्या. त्यांनी त्यांची मतं माझ्यावर लादली नाहीत. त्यामुळे आमच्यातला एकोपा टिकून होता. आपल्या उत्सवांचं, सणवारांचं विडंबन होऊ नये हे महत्त्वाचं असं आम्हा दोघींचंही ठाम मत होतं. त्यामुळे आमच्यात सामंजस्य टिकून राहिलं.

रश्मी पाटील

 सणावारांची जपणूक आवश्यक

आपले जे परंपरेनुसार येणारे सणवार आहेत. ते आमच्याकडे साजरे केले जातात. सुनेने आपले रीतीरिवाज, कुलाचार पार पाडायला हवेत अशी अपेक्षा असते. कारण ते तिला माहीत व्हायला हवेत, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून ते घरगुती थोडक्यात साजरे करावेत असं वाटतं. सुनेकडून माझ्या जास्त अपेक्षा नाहीत. देव हा मानण्यावर आहे. मी मानला तर सून मानेल. तिची मुलं मानतील. देवावर श्रद्धा ठेवायलाच हवी. मी स्वतः 30 वर्षे नोकरी करत होते. रोज सकाळी साडेसात वाजता घर सोडायचे. तरीही सर्व सणवार करायचे. हे अशासाठी की माझ्या मुलींनाही सणवारांची ओळख व्हावी. मी नाही केलं तर मुलींवर त्याचे संस्कार होणार नाहीत. सवाष्णांना हळदकुंकू लावणं अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी तरी आजच्या सुनांनी माहीत करून घ्यायला हव्यात. आम्हा दोघींची मतं जुळतात. त्यामुळे आमच्यामध्ये वादविवाद होत नाहीत.

वंदना वसंत शेलार

 

श्रद्धा असेल तरच

माझ्या माहेरी आणि सासरी कुलाचारांचं पालन केलं जातं. लग्न झाल्यावर मी स्वतंत्र घरात राहू लागले. तिथे मी नवरात्र, गौरी-गणपती, श्रावणातले सर्व सण, पाडवा, दसरा हे सण त्या घरीही साजरे करत होते. आम्ही हे सणवार केले, पण आता पुढच्या पिढीने ते करायचे की नाहीत, हे त्यांचं त्यांनीच ठरवावं. मीही नोकरी करूनच सर्व करायचे, तरीही सुनेने माझ्यासारखी व्रतवैकल्ये करावीत हा माझा आग्रह नाही. तेव्हा आम्ही लवकर उठून करियर सांभाळून सणावारांनाही वेळ द्यायचो. कुळाचार किती पाळायचे हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहेत अशा मताची मी आहे. त्यामुळे सुनेवर मी कोणतीही जबरदस्ती करत नाही. आजही सासू-सून एकत्र येऊन सण साजरे करतो तेव्हा एक उत्साही वातावरणनिर्मिती घरात होते. आपोआपच आपले संस्कार नातवंडांमध्येहे रुजवले जातात.

विद्या कुलकर्णी

आपली प्रतिक्रिया द्या