
तीन तासांचा संघर्ष, श्वास रोखून धरणारा थरार आणि निर्णायक क्षणी दाखवलेली अफाट मानसिक ताकद… युकी भांबरी आणि धाक्षिणेश्वर सुरेश यांनी डेव्हिस कप क्वालिफायर्स राऊंड-1 मध्ये नेदरलँड्सला गुडघे टेकायला लावत हिंदुस्थानला 2-1 अशी बहुमोल आघाडी मिळवून दिली. हिंदुस्थानी जोडीने डेव्हिड पेल-सँडर आरेंड्स यांना 7-6 (0), 3-6, 7-6 (1) असे नमवत सामना आपल्या नावावर केला. कर्णधार रोहित राजपाल यांनी एन. श्रीराम बालाजीऐवजी धाक्षिणेश्वरवर टाकलेला डाव अचूक ठरला.
1-1 अशा बरोबरीनंतर आघाडीसाठी दोन्ही संघांनी सर्वस्व पणाला लावले होते. हा सामना केवळ टेनिसचा नव्हता, तर संयम, जिद्द आणि दबावाखाली शांत राहण्याची खरी परीक्षा होती.
संकटांवर मात, टायब्रेकमध्ये वर्चस्व!
युकी भांबरीची सर्व्हिस पहिल्या सेटमध्ये सातत्याने अडचणीत आली. सातव्या गेममध्ये डबल फॉल्टमुळे डच जोडीला ब्रेक पॉइंट मिळाला, पण भांबरीने कणखर रिटर्न देत संकट टाळले. धाक्षिणेश्वरने गेम पॉइंटवर सोपी व्हॉली चुकवली, आरेंड्सचा ओव्हरहेड स्मॅश लागला, तरीही हिंदुस्थानने हार मानली नाही. 11व्या गेममध्ये पाच ब्रेक पॉइंट्स वाचवत हिंदुस्थानी जोडीने प्रेक्षकांना उभे केले. अखेर टायब्रेकमध्ये भांबरी-धाक्षिणेश्वर यांनी एकही गुण न गमावता सेट खिशात घातला.
निर्णायक सेटमध्ये जिद्दीचा विजय!
निर्णायक सेटमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला. हिंदुस्थानला सुरुवातीला ब्रेकच्या संधी मिळाल्या, पण त्या साधता आल्या नाहीत. मात्र धाक्षिणेश्वरने दबावात थंड डोक्याने खेळत ब्रेक पॉइंट्स वाचवले. सामन्याचा टार्ंनग पॉइंट ठरला आरेंड्सचा डाव्या हाताच्या दुखापतीमुळे घेतलेला मेडिकल टाइमआऊट. त्यानंतर त्यांच्या सर्व्हिसची धार कमी झाली आणि हिंदुस्थानी जोडीने संधी साधली. टायब्रेकमध्ये हिंदुस्थानने पुन्हा वर्चस्व गाजवत सामना आणि टाय दोन्ही आपल्या नावावर केले. या जिद्दी विजयासह हिंदुस्थानने नेदरलँड्सविरुद्ध 2-1 अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. आता परतीच्या एकेरीमध्ये सुमित नागलचा सामना जेस्पर डी यॉन्गशी होईल

























































