कोलकाताच्या ऐतिहासिक डे-नाइट कसोटीची नाणेफेक सोन्याच्या नाण्याने

हिंदुस्थानात पहिल्यांदाच यजमान हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यात दिवस-रात्र कसोटी क्रिकेट लढत येत्या 22 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. ईडन गार्डनवर दुधाळ प्रकाशात आणि गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या (कॅब) यजमानपदाखाली रंगणाऱ्या या विशेष लढतीत नाणेफेक सोन्याच्या नाण्याने केली जाणार असून लढतीला उपस्थित राहणाऱ्या हिंदुस्थानच्या माजी कसोटीपटूंना चांदीचे नाणे भेटीदाखल दिले जाणार आहे.

कॅब आणि हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या लढतीसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. या लढतीला बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.शिवाय हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लढतीसाठी बीसीसीआयने विशेष निमंत्रण पाठवले आहे.

पाहुण्यांसाठी 50 पक्वान्ने आणि भेटवस्तू

हिंदुस्थानातील पहिल्या डे -नाईट कसोटीचे यजमानपद भूषवणाऱ्या बंगाल क्रिकेट असोसिएशनने या ऐतिहासिक कसोटीला येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांची सरबराई करण्याचे ठरवले आहे.या पाहुण्यांसाठी यजमान असोसिएशनने देशातील 50 पक्वान्नांची मेजवानी देण्याचे ठरवले आहे. शिवाय बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांचा बंगाली साडी भेट देऊन गौरव करण्यात येणार आहे. शिवाय लढतीला उपस्थित माजी कसोटी कर्णधारांचा या लढतीप्रसंगी चांदीची नाणी भेट देऊन गौरव करण्यात येणार आहे. या सर्व पूर्वतयारीवर कॅब आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली विशेष लक्ष देऊन आहेत.

 

 

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या