रत्नागिरीच्या कोसुंब गावात चिरे खाणीत सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह

रत्नागिरीतील देवरुख नजीकच्या कोसुंब आडवा मारुती बस थांबा नजीकच्या जुन्या चिरेखाणी मध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून देवरुख पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार, कोसुंब येथे काम करणाऱ्या कामगारांना येथील जुन्या चिरेखाणीत मृतदेह तरंगताना दिसून आला. त्यानंतर याची माहिती पोलीस पाटील यांनी देवरुख पोलीस स्थानकात दिली. त्यानंतर देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी राजू काकडे हेल्प अकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी त्या चिरेखाणीत उतरून त्या इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. मिळून आलेल्या अज्ञात मृत तरुणाने जीन्स पँट परिधान केली होती, तसेच त्याच्या पायात पांढऱ्या रंगाचे बुट आणि त्याने हातमोजे घातलेले होते. हा तरुण सुमारे तीस ते पस्तीस वर्षाचा असल्याचा अंदाज आहे.

देवरुख पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, हेडकॉन्स्टेबल डी एस पवार, जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी पोलीस पाटील पांडुरंग खाके, कोसुंब गावचे तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र जाधव, आबा जाधव उपस्थित होते. मृतदेहाचे शवविच्छेदन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करत आहेत.