सफाळेतील कोरोनाबधित मृत व्यक्तीच्या दोन्ही मुली निगेटिव्ह

1409

पालघर तालुक्यातील सफाळे उसरणी येथील करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत व्यक्तीच्या दोन मुलींसह निकटवर्तीयांच्या स्रावाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. दोन्ही मुलींच्या चाचण्या निगेटिव्ह निघाल्या आहेत.

बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निकट सहवासात असलेल्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबई येथे पाठवण्यात आले होते. यामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली आहे.त्यांच्या पत्नीवर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात विलगिकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सफाळे व उसरणी परिसर संपूर्णपणे सीलबंद केला असल्याची माहिती जिल्ह्याधिकार्‍यांनी दिली. या ठिकाणी असलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण आरोग्य पथकामार्फत करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. उसरणी व सफाळे परिसरात या व्यक्तीचा संबंध व संपर्क आलेल्या ठिकाणी परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याचबरोबरीने या व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या नातेवाईकांना विलगीकरण करण्यात आले आहे. मृताच्या निकट सहवासीतांच्या घशाचे नमुनेही  तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, हे अहवाल अजूनही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेले नाहीत.

दिवसेंदिवस करोनाच्या संसर्ग वाढत असला तरी त्याचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विविध यंत्रणांमार्फत यावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. करोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याकडे पुरेसा निधी उपलब्ध असून यासाठी उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणा जिल्ह्याकडे पुरेशा उपलब्ध असून औषध साठा तसेच उपचार करताना लागणारे संरक्षणात्मक किट ही उपलब्ध असल्याची पुष्टी त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या