
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील हेदली गावी बिबट्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.
हेदली गावचे पोलीस पाटील नरेद्र खानविलकर आणि ग्रामस्थ फत्तेसिंग इंदुलकर हे सोमवारी संध्याकाळी गावाबाहेरील मदिरात गेले असता त्यांना दुर्गंधी आली. शोध घेतला असता देवळासमोर रस्त्या पासून सुमारे दीडशे फुटावर भात शेताच्या मळीत बिबट्या सडलेल्या अवस्थेत दिसून आला .
याविषयी खबर पोलीस पाटील नरेद्र खानविलकर यांनी वनपाल सुरेश उपरे यांना दिली. खबर मिळताच वनपाल उपरे यांच्या सोबत वनरक्षक नानु गावडे, आनंद धोत्रे व सागर गोसावी अशी चौघांची टीम घटनास्थळी पोहचली. तो पर्यंत रात्री उशीर झाल्याने याचा तपास व वैद्यकीय तपासणी सकाळी करण्याचा निर्णय वनरक्षक उपरे यांनी वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार घेतला. सकाळी देवरुखहून पशुवैद्यकीय अधिकारी गणेश मेश्राम, वनरक्षक, गावातिल प्रतिष्ठीत ग्रामस्थ सुनिल इंदुलकर, प्रमोद इंदुलकर ,फत्तेसिंग इंदुलकर, पो. पा. खानविलकर, आदी ग्रामस्थांच्या उपस्थित बिबट्याची तपासणी केली असता मृत बिबट्याचे सारे अवयव जाग्यावर दिसून आले तर कातडी पूर्णत: सडलेली पहायला मिळाली. बिबट्याचा मृत्यू हा साधारणःता पाच ते सहा दिवसांपूर्वी नैसर्गिकरित्या झाल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी मेश्राम यांनी जाहीर केले. बिबट्या पूर्णत: सडला असल्याने त्याला शेतातच अग्नी देण्यात आला.
























































