किल्लारी कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत निर्णय न झाल्याने सभासद संतप्त

2

सामना प्रतिनिधी । किल्लारी

किल्लारी कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत निर्णय अद्याप न झाल्याने शेतकरी सभासद संतप्त झाले आहेत. या साखर कारखान्यावर ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी, कामगार यांच्या भवितव्याचा प्रश्न अवलंबून आहे. या साखर कारखान्यासाठी येथील विविध पक्षांच्या लोकांनी आंदोलने केली. त्याची दाखल घेऊन शासन व एम.एस.सी बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत बैठक लावून 24 ऑगस्ट रोजी किल्लारी कारखाना भाडे तत्वावर देण्यात येईल, असा निर्णय घेतला होता. 24 ऑगस्टची मुदत संपून 15 दिवस झाले तरीही किल्लारी कारखान्याबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नसल्याने शेतकरी सभासद नाराज झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांनी किल्लारी साखर कारखाना सुरू करू. या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल केल्याशिवाय स्वथ बसणार नाही, असा शब्द दिल्याने विविध पक्षाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने मागे घेतली होती. आता तारीख पे तारीख देऊन फक्त मुक्ताफळेच उधळणार काय? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. येत्या चार दिवसात किल्लारी कारखाना तत्काळ भाडेतत्वावर देण्याच्या प्रक्रीयेला सुरूवात न झाल्यास शेतकरी पुन्हा तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसतील, असा इशारा देण्यात आला आहे.

किल्लारी परिसरामधील औसा, उमरगा आणि निलंगा अशा तीन तालुक्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असून कारखाना सुरु न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.