रेल कामगार सेनेने अनेक वर्षे लढा देऊनही रेल्वे बोर्डाने भायखळा प्रिंटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथे काम करणाऱया कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला असून कामगारांचे प्रमोशन जलदगतीने व्हावे तसेच स्कील कामगारांना जोखमीची किंवा अवजड कामे देता कामा नये, एपूण 130 कामगारांना लवकरच स्टोअरमध्ये समाविष्ट करावे, अशा अनेक मागण्यांसाठी आज रेल कामगार सेनेने मध्य रेल्वेचे पीसीएमएम म्हणजेच प्रिन्सिपल चीफ मटेरियल मॅनेजर गर्ग यांची भेट घेऊन सर्व गोष्टींवर विस्तृत चर्चा केली. त्यानंतर रेल्वे प्रिंटिंग प्रेसच्या कामगारांसाठी वरिष्ठ पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पीसीएमएम गर्ग यांनी दिले.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली आज मध्य रेल्वेचे पीसीएमएम गर्ग यांची भेट घेतली. यावेळी डेप्युटी सीएमएम मीना उपस्थित होते. रेल कामगार सेनेने प्रामुख्याने भायखळा प्रिंटिंग प्रेसच्या कामगारांच्या पुनर्वसनाच्या प्रस्तावाबाबत सविस्तर चर्चा केली. प्रिंटिंग प्रेसमधील कामगारांचे प्रमोशन करताना यात कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ यांचे प्रमोशन जलदगतीने व्हावे अशी आग्रही भूमिका रेल कामगार सेनेने समोर ठेवली आणि ती मान्यही करण्यात आली. यावेळी नरेश बुरघाते, विजय शिरोडकर, शैलेश शिंदे, दिलीप पाटील, अनिल देसाई, विलास परब, राजेश कोकाटे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जोखमीचे किंवा अवजड काम नको
प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असलेला कर्मचारी वर्ग पुशल कामगार आहे. त्यामुळे त्यांना अन्य ठिकाणी जखमीचे किंवा अवजड असे काम झेपणार नाही, त्या दृष्टीने विचार करण्यात यावा. बरेच कामगार निवृत्तीच्या जवळ आले असून त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. एपूण 130 कामगारांना लवकरच स्टोअरमध्ये समाविष्ट करावे ही संघटनेची भूमिका मांडली. वरिष्ठ पातळीवर लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल आणि त्यात पुणावरही अन्याय होणार नाही, असे अधिकाऱयांनी सांगितले.