गद्दार आमदारांना समारंभांनाही जाणं कठीण! बांगरांना पाहून लग्न मंडपातच 50 खोके-एकदम ओक्केच्या घोषणा

शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात सहभागी झालेल्यांना जनतेने माफ केलेलं नाही आणि त्यांच्या विरोधात असलेला असंतोष विविध प्रकारे बाहेर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. असाच अनुभव शिंदे गटात सहभागी झालेल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांना आला आहे. विशेष म्हणजे हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता तरी देखील आमदारांना अवघडल्यासारखं होईल अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. एका लग्न समारंभात सहभागी झालेल्या बांगर यांना ’50 खोके एकदम ओक्के’च्या घोषणांना सामोरं जावं लागलं आहे. खासगी मराठी वृत्तसंकेत स्थळांनी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

शिंदे गटाच्या आमदारांना ते जातील तिथं 50 खोके एकदम ओक्केच्या घोषणांना सामोरं जावं लागत आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी 50 खोके-एकदम ओक्के आणि गद्दार म्हणत शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांवर सातत्याने निशाणा साधला. तर, विधानसभेच्या पायरीवरही 50 खोके, एकदम ओक्केचे बोर्ड आणि घोषणा झळकल्या होत्या. त्यामुळे, 50 खोके, एकदम ओक्के ही घोषणा गावगावात, गल्लीबोळात पोहोचली आहे. सोमवारी एका लग्नाला गेलेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समोरच 50 खोके, एकदम ओक्केची घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी, त्यांचा चेहरा खजील झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

परभणीतील देवेगाव येथे संतोष बांगर यांनी हजेरी लावली. यावेळी, लग्न मंडपात पहिल्यापासून उपस्थित असलेल्या परभणीचे खासदार संजय बंडू जाधवांना बांगर यांनी चरण स्पर्श केला. त्याचवेळी, तेथे उपस्थित काही कार्यकर्त्यांकडून`50 खोके एकदम ओक्के`च्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे लग्नमंडपात काही काळ गोंधळ निर्माण झाला. शेवटी खजील झालेल्या बांगर यांना निघून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान दिलेलं चॅलेंज मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही असं आव्हान त्यांनी दिलं होतं, पण बांगर यांच्या गटाच्या फक्त 5 जागाच निवडून आल्या. यानंतर बांगर यांनी दिलेल्या चॅलेंजचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावर कधी काढताय मिशा, अशी विचारणा नेटकरी करत होते.