
सामना ऑनलाईन, मुंबई
गृहनिर्माण संस्थेची इमारत उभी असलेली जागा संस्थेच्या नावावर व्हावी (डीम्ड कन्व्हेन्स) म्हणून धडपडणाऱया रहिवाशांना खुशखबर आहे. आतापर्यंत गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नसल्याने त्यांचे डीम्ड कन्व्हेन्स होत नव्हते. पण सरकारने सदर अट शिथिल केली आहे. त्यामुळे इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसले तरी संस्था डीम्ड कन्व्हेन्ससाठी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करू शकणार आहे. मात्र इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याबरोबरच इतर जबाबदाऱया संस्थेच्याच राहतील याबाबतचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
मुंबई, ठाण्यातील शेकडो इमारतींची सहकार विभागाकडे गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणी आहे. मात्र सदर इमारतीला ओसी नसल्याने किंवा रहिवाशांमध्ये एकी नसल्याने त्यांच्या इमारतीच्या जागेचे डीम्ड कन्व्हेनस होऊ शकलेले नाही. त्यामुळे विकासक वारंवार आपला जागेवर हक्क सांगून रहिवाशांची आर्थिक लूट करतात किंवा पुनर्विकासादरम्यान मनमानी करतात. त्याला चाप लावण्यासाठी सरकारने ओसी नसलेल्या इमारतींच्या जागेचे डिम्ड कन्व्हेन्स करण्याचे निर्देश सहकार विभागाला दिले आहेत. त्यासाठी सोसायटीला ओसी मिळवण्याबरोबरच इतर जबाबदाऱया संस्थेच्याच राहतील, याबाबत लेखी हमी द्यावी लागणार आहे. त्यामुळे आतापर्यंत डीम्ड कन्व्हेन्स न झालेल्या गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑनलाइन प्रक्रियेतही सुसूत्रता
आतापर्यंत डीम्ड कन्व्हेन्ससाठी अर्ज करताना सर्व कागदपत्र सहाकार खात्याच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागत. मात्र सर्व कागदपत्रांची फाईल एक एमबी पेक्षा कमी असणे अवश्यक होते. परंतु सर्व कागदपत्रे अपलोड केल्यास त्याची साईज मोठी झाल्याने अर्ज पूर्ण होत नव्हता. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेत सुसूत्रता आणली असून मोजकीच कागदपत्रे ऑनलाइनला अपलोड करावी लागणार असून उर्वरित सेल ऍग्रमेंटबरोबरच इतर मोठय़ा साईजची कागदपत्रे ऑफलाइन सादर करता येणार आहेत.
एका सभासदाच्या सेल अॅग्रीमेंटची गरज
इमारत उभी असलेल्या जागा संस्थेच्या नावावर करण्यासाठी किंवा विकासकाकडे जागेबाबत असलेले हक्क संस्थेला मिळावेत म्हणून जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करताना सोसायटीमधील सर्व सभासदांचे सेल अॅग्रीमेंट सादर करावे लागत होते. पण आता केवळ एका सभासदाचे सेल अॅग्रीमेंट अर्जासोबत जोडले तरी चालणार असल्याची माहिती सहकार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.
























































