
विकी कौशलचे नाव सध्या बॉलिवूडमध्ये खूप गाजत आहे. त्याच्या आगामी पौराणिक चित्रपटाची चर्चा सध्या खूप जोरदार सुरू आहे. ‘महावतार’ या चित्रपटासाठी सध्या विकी त्याच्या लूकवर मोठ्या प्रमाणात काम करण्यात व्यस्त आहे. परशुरामांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात विकीसोबत दीपिका पादुकोण झळकणार होती. परंतु आता काही कारणास्तव दीपिकाला डच्चू मिळाला असून, त्याजागी आता श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे.
‘मिड-डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माते दिनेश विजन यांनी ‘महावतार’मधील महत्त्वाच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरला विचारले आहे. दीपिकाशी काही कारणांमुळे वाद झाल्याने, तिला डच्चू देण्यात आल्याची चर्चा सुरू झालेली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी आणि श्रद्धा प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांच्या या नव्या केमिस्ट्रीमुळे त्यांच्या फॅन्सची उत्सुकता देखील वाढली आहे. महावतार २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असून, जून महिन्यानंतर चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे.




























































